सुप्रिया दाबके , लोकसत्ता

मुंबई : शिखर धवन भांडी घासतोय, हरभजन सिंग खाद्यपदार्थ बनवतोय, रोहित शर्मा मुलीशी खेळतोय, हे चित्र सध्या करोनामुळे लागू असलेल्या  टाळेबंदीच्या काळात बघायला मिळत आहे. एरवी सतत धावपळीचे जीवन जगणाऱ्या या क्रीडापटूंसाठी घरच्यांना वेळ देण्याचा आनंद असला तरी खेळापासून दूर राहिल्यामुळे येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी ते मन:सामर्थ्य वाढीवर भर देत आहेत.

’सध्या करोनामुळे क्रीडा स्पर्धा थांबलेल्या असताना खेळाडूदेखील सरावापासून दूर आहेत. मात्र घरात असतानाही शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच मन:सामर्थ्य वाढवण्याचे उद्दिष्ट खेळाडूंनी जोपासले आहे. ऑलिम्पिकसारखी महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर गेल्याने खेळाडूंच्या चिंता वाढल्या आहेत. याबाबत खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा मार्गदर्शन करणारे पुण्यातील लक्ष्य क्रीडा अकादमीचे डॉ. स्वरूप सॅवॅनूर म्हणाले की, ‘‘खेळाडूंनी ऑलिम्पिक लांबल्याने निराश न होता सकारात्मक विचार करावा. ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी वाढीव दिवस मिळत आहेत. सध्या जो खेळाडूंना वेळ मिळत आहे त्यामध्ये त्यांनी मन:सामर्थ्य वाढवण्यावर भर द्यावा.’’

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत ८७ किलो वजनी गटातील ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या सुनील कुमारला ऑलिम्पिक एका वर्षांने लांबल्याने तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे; पण सध्याच्या सक्तीच्या विश्रांतीच्या कालखंडात तो मन:सामर्थ्यांकडे गांभीर्याने पाहात आहे. ‘‘ऑलिम्पिकला अजून मला पात्र ठरायचे आहे. करोनामुळे सध्या घरी असलो तरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून व्यायाम करतो. तसेच संध्याकाळीही व्यायाम करतो. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मिळालेले दिवस आणखी महत्त्वाचे ठरतील,’’ असे सुनील कुमारने सांगितले.

खेळाडूंना घरात तंदुरुस्ती कशी जपता यावी, यादृष्टीने ‘साइ’कडून ऑनलाइन उपक्रम सुरू आहेत. त्यासाठी ते नावाजलेल्या क्रीडा मानसोपचारतज्ज्ञांसह नामांकित खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. त्या उपक्रमाचे मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी कौतुक केले.