सोलापूरजवळचा बार्शी तालुका खेळ किंवा खेळाडूंपेक्षाही कृषीपिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र याच शहरातल्या प्रार्थना ठोंबरेने टेनिस हा आपला ध्यास मानला आणि त्यातच वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. प्रार्थनाने रविवारी चेन्नईत झालेल्या आयटीएफ महिला फ्यूचर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावत शिरपेचात मानाचा तुरा खोवला. छोटय़ा शहराची पाश्र्वभूमी असणाऱ्या, मात्र मोठी भरारी घेण्याची क्षमता असलेल्या मोजक्या खेळाडूंत प्रार्थनाचा समावेश झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या स्पर्धेतही अव्वल खेळाडूंना नमवत प्रार्थनाने जेतेपदावर कब्जा केला होता. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत कनिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रार्थनाची राज्य टेनिस संघटनेतर्फे स्पेनमधील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. तालुका-जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध करत दमदार आगेकूच करणाऱ्या प्रार्थनाशी जेतेपदाच्या निमित्ताने केलेली बातचीत.
*चेन्नईतील आयटीएफ जेतेपदाचे तुझ्या कारकिर्दीतील महत्त्व काय?
स्पर्धा कोणतीही असो, प्रत्येक जेतेपद महत्त्वाचे आहे. चेन्नईत झालेल्या स्पर्धेचे काही पैलू पाहता हे जेतेपद समाधानकारक आणि सुखावणारे होते. संपूर्ण आठवडय़ात स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या खेळाडूंना नमवत जेतेपद पटकावता आले याचा आनंद सर्वाधिक आहे. चेन्नईतले वातावरण अतिशय उष्ण होते. तीन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या सामन्यात तंदुरुस्ती राखणे प्रचंड आव्हान होते. हे आव्हान पेलता आले. माझी प्रतिस्पर्धी इटी मेहता दर्जेदार खेळाडू आहे. दोन मॅच पॉइंट्सची संधी इटीला होती. या स्थितीतून विजयश्री खेचून आणली. सक्षम खेळाडूला नमवून जेतेपद कमावल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. १०,००० अमेरिकन डॉलर्स बक्षीस रक्कम असलेल्या आयटीएफ स्पर्धेत मी यापूर्वी खेळले आहे, मात्र जेतेपदाने हुलकावणी दिली होती. या वेळी मात्र माझा निर्धार पक्का होता. योजनेनुसार खेळ झाल्यानेच यश मिळाले.
*बार्शीमध्ये टेनिस हा खेळ नक्कीच घरोघरी खेळला जात नाही. तुझी सुरुवात कशी झाली?
माझ्या घरी क्रीडा क्षेत्राशी संबंधित कोणीच नाही. बार्शीमध्ये केवळ एकमेव टेनिस कोर्ट आहे. मोकळ्या वेळेत टेनिस खेळायला सुरुवात केली आणि हळूहळू या खेळाबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. त्यानंतर मी सोलापूरला राजीव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला सुरुवात केली. टेनिसमधल्या मूलभूत गोष्टी, कौशल्ये याची माहिती झाली. या खेळामध्येच कारकीर्द करावी असे पक्के केले आणि त्यानंतर प्रगत प्रशिक्षणासाठी पुण्याला आले. सध्या मी हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळते.
*टेनिससारख्या खडतर खेळाचा मार्ग स्वीकारल्यानंतर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? आतापर्यंतच्या वाटचालीत त्यांची भूमिका कशी आहे?
घरच्यांचा आधार हीच माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. घरात खेळविषयक वातावरण नसताना त्यांनी माझ्या टेनिस खेळण्याला प्रोत्साहन दिले. चांगल्या प्रशिक्षणाची निकड लक्षात आल्यावर त्यांनी मला सोलापूरला पाठवले. एक खेळाडू आणि माणूस म्हणून प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या मागे ते खंबीरपणे उभे असतात आणि म्हणूनच आतापर्यंतच्या वाटचालीत त्यांचा आधार महत्त्वपूर्ण आहे. मुलगी आहे आणि टेनिससारख्या शारीरिकदृष्टय़ा कसोटी पाहणाऱ्या खेळाची निवड करूनही त्यांनी विरोध केला नाही, उलट नेहमी प्रोत्साहन दिले. स्पर्धा, सराव शिबिरे यांच्यानिमित्ताने सातत्याने देश आणि परदेशात फिरावे लागते. मात्र त्यांचा पाठिंबा असल्याने मी शांतचित्ताने टेनिसवर लक्ष केंद्रित करू शकते.
*टेनिस हा खेळ मोठय़ा शहरांमध्ये लोकप्रिय आहे. छोटय़ा शहरातील सुविधा लक्षात घेता, शहरी खेळाडूंना टक्कर देणे कितपत कठीण आहे?
फरक निश्चितच आहे, पण खेळाची खरी आवड असेल आणि जिद्द असेल तर या खेळाडूंनाही नमवता येते. लहानपणापासून मला फिटनेसची प्रचंड आवड होती. फिट राहण्यासाठी मी कसून मेहनत घेत होते. त्यामुळेच टेनिस खेळतानाही जोरकस फटक्यांवर मी भर देऊ शकते. शहरी मुलांना मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे कौशल्य या मुद्दय़ावर ते सरशी साधू शकतात. मात्र टेनिसमध्ये कौशल्याइतकीच शारीरिक क्षमताही महत्त्वाची आहे. शहर कुठले यापेक्षाही कच्चे दुवे आणि क्षमता हे ओळखून खेळ केला, तर आगेकूच करता येते.
*तुझ्या आगामी योजना काय आहेत?
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी कौशल्य, तंदुरुस्ती, प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्वच मुद्दय़ांवर सातत्याने सुधारणा होणे आवश्यक आहे. स्पर्धा अतिशय तीव्र आहे. याव्यतिरिक्त दुखापतींचे व्यवस्थापन करणेही गरजेचे आहे. चेन्नईतील स्पर्धेनंतर सराव शिबिरासाठी मी उझबेकिस्तानला रवाना होणार आहे. त्यानंतर वर्षभरात होणाऱ्या स्पर्धामध्ये मला सातत्यपूर्ण प्रदर्शन करायचे आहे. विशिष्ट स्पर्धा महत्त्वाची असे मी मानत आहे. प्रत्येक स्पर्धा, जेतेपद माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.