व्रूम व्रूम..असा आवाज करत जणू वेगाशी स्पर्धा करणाऱ्या ‘फॉर्म्युला’ ड्रायव्हर्सच्या यादीत आता अरेबियन मुलीचाही समावेश झाला आहे. ‘फॉर्म्युला वन’मध्ये आपण आजवर नेहमी पुरूषांचीच चलती पाहिली आहे. पण अरेबियातून पहिल्यांदा एका १७ वर्षांच्या मुलीने या वेगाच्या थरारात एन्ट्री घेतली आहे. अमना अल क्युबेसी ही ‘फॉर्म्युला-४’ मध्ये समील होणारी पहिली अरेबियन महिला ड्रायव्हर ठरणार आहे.

‘फॉर्म्युला’च्या जगात एक पुरूष ड्रायव्हर जसं वेगाशी खेळू शकतो, तसंच एक महिला ड्रायव्हरही करू शकते हे मला दाखवून द्यायचं आहे, असं अमना मोठ्या आत्मविश्वासाने सांगते. अमनाने नुकतेच बेहरिन येथे झालेल्या जीसीसी अकादमीने घेतलेल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याशिवाय, सिनिअर क्लास रोटेक्स मॅक्स चॅलेंज स्पर्धा जिंकणारी ती पहिली महिला स्पर्धक ठरली होती.
अमनाला ‘फॉर्म्युला’चा वारसा वडिलांकडून मिळाला. वयाच्या नवव्या वर्षापासून अमना ड्रायव्हिंग करत आहे. फॉर्म्युलासाठी आपले वडील प्रेरणास्थान असल्याचं अमना मोठ्या अभिमानाने सांगते.