ICC Men’s Cricket World Cup Super League स्पर्धेत पहिल्याच मालिकेत यजमान इंग्लंडने बाजी मारली. साऊदॅम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचं आव्हान ४ गडी राखत परतवून लावलं. याचसोबत ३ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. विजयासाठी दिलेलं २१३ धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज ८२ धावांची खेळी केली. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सामन्यात एक विचित्र घटनादेखील घडली.

इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी १६व्या षटकात आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटल षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी जॉनी बेअरस्टो या फलंदाजी करत होता. बेअरस्टोची फटकेबाजी गोलंदाज लिटलला फारशी रूचली नाही. त्यामुळे त्याला बाद केल्यानंतर लिटल रागाच्या भरात बेअरस्टोला शिवीगाळ करताना दिसला. त्याचा दणका लिटलला सामन्यानंतर बसला.

ICCच्या आचारसंहितेतील नियमाचा भंग केल्याप्रकरणी लिटल याला एक डिमेरिट पॉईंट बहाल करण्यात आला. नियमावलीतील कलम २.५चा भंग केल्याने शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. लिटल आपण शिवीगाळ केल्याचे मान्य करत सामनाधिकारी यांनी केलेली कारवाई मान्य असल्याचे सांगितले.

दरम्यान, दुसऱ्या वन डे सामन्यात आयर्लंडचे पहिले ६ गडी १०० धावा व्हायच्या आतच माघारी परतले. अखेरच्या फळीतील कर्टिस कॅम्फरने सिमी सिंग आणि अँडी मॅगब्रिन यांना हाताशी घेत छोटेखानी भागीदाऱ्या रचल्या. या जोरावर आयर्लंडने २१२ धावांचा टप्पा गाठला. कॅम्फरने सामन्यात ६८ धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने दमदार खेळी केली. याच प्रयत्नांच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडचे आव्हान ३३व्या षटकातच पूर्ण केले.