अ‍ॅशेस मालिकेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाला ४-० किंवा त्यापेक्षा चांगल्या फरकाने नमवल्यास आयसीसी क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान काबीज करण्याची इंग्लंडला संधी आहे. इंग्लंडचा संघ सध्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ ११९ गुणांसह अव्वल स्थानी आहे तर इंग्लंडचा संघ ११६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी क्रमवारीत अधिराज्य गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. अव्वल चारमध्ये प्रवेश करण्याची ऑस्ट्रेलियाला संधी आहे. १०१ गुणांसह ऑस्ट्रेलिया सध्या पाचव्या स्थानी आहे. इंग्लंडपेक्षा ते १५ गुणांनी पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखल्यास ते अव्वल चारमध्ये आगेकूच करू शकतात. ही मालिका त्यांनी ४-० फरकाने जिंकल्यास त्यांना क्रमवारीत पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडला मागे टाकण्याची हुकूमी संधी आहे.