|| गौरव जोशी

सध्याच्या इंग्लंड संघातील जोस बटलर, जो रूट, ख्रिस वोक्स या खेळाडूंनी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला क्रिकेट क्लब, हिरवीगार मैदाने अशा अनेक सुखसुविधा होत्या. परंतु या संघातील मोईन अली हा वेगळ्याच वातावरणातून आला आहे. बर्मिगहॅममधील स्टोन लेन या गावात मोईन लहानाचा मोठा झाला. या ठिकाणी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काही भारतीय लोकांची वस्ती आहे. परंतु तेथे राहणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी लोकांची संख्या जास्त आहे.

मोईनने याच ठिकाणी असलेल्या एका मोठय़ा सिमेंट काँक्रीटच्या मैदानावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. साधारण २० मीटर लांबी-रुंदी असलेल्या या चौकोनी मैदानाच्या एका बाजूला पाकिस्तानी हॉटेल्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला लोकवस्ती. तेथेच नेल्सन मंडेला प्राथमिक शाळासुद्धा आहे. त्याच शाळेत मोईनचे शिक्षण झाले होते. त्याच्याच वयाच्या पाकिस्तानी मुलांसोबत तो टेनिसच्या चेंडूने खेळायचा.

१५-२० वर्षांपूर्वी हे गाव इतके सुधारलेले नव्हते. सतत मारामाऱ्या, चोऱ्या इथे व्हायच्या. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत राहूनही मोईनवर त्याचा कधीही वाईट परिणाम झाला नाही. क्रिकेट खेळण्यालाच त्याने नेहमी प्राधान्य दिल्याने तो हे यशाचे शिखर गाठू शकला. चार वर्षांपूर्वी मोईन याच ठिकाणी राहत होता. तेथील वयस्क गृहस्थ मला म्हणाले, ‘‘मोईन इतका मोठा खेळाडू झाला आहे तरी त्याला स्टोन लेनबद्दल आपुलकी आहे. मोईनला जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा तो या ठिकाणी येथील लहान मुलांसोबत चक्क क्रिकेट खेळतो. हॉटेलमध्ये जाऊन तेथील नान, पराठय़ाचा आस्वाद तो घेतो. सर्वासोबत मिळून मिसळून तो राहतो.’’

मोईनचे आई-वडील अजूनही स्टोन लेन येथेच राहतात. या परिसरातील कुणीही अभिमानाने सांगतात की, हे मोईनच्या आई-वडिलांचे घर आहे. ब्रिटिश-पाकिस्तानी मोईनने सोयी-सुविधांचा अभाव असतानाही मेहनत घेऊन आज इंग्लडच्या संघात आपले स्थान पक्के केले आहे. तेथील लहानांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वानाच मोईनविषयी गर्व वाटतो. आजही सायंकाळी मोईनसारखी अनेक मुले या काँक्रीटच्या मैदानावर खेळताना दिसतात. याआधी ८० टक्के मुले ही पाकिस्तानी होती, परंतु आता येथे अफगाणी मुलेदेखील खेळायला येतात. तिथे खेळणारी मुले सांगतात, ‘‘मोईन हा आमचा आवडता क्रिकेटपटू आहे. परंतु अफगाणिस्तान संघातील रशीद खानदेखील आम्हाला आवडतो.’’

अफगाणिस्तानमधील क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्यादेखील आता वाढत चालली आहे. दररोज संध्याकाळी या मैदानात १०-१५ षटकांचे सामनेदेखील ही मुले खेळतात. मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना जसे नियम ठरवले जातात, तसेच तिथेसुद्धा आहेत. सरळ ४० मीटर दूर चेंडू गेला की षटकार, आजूबाजूला मारला तर चौकार, आणि कम्पाउंडच्या वरती चेंडू गेला की फलंदाज बाद होतो. ही मुले सांगतात, ‘‘मोईनसारख्या मुलाने चांगली कामगिरी करून इंग्लंड संघात स्थान मिळवून आम्हाला एक योग्य दिशा दाखवली आहे. आम्हीसुद्धा मेहनत घेऊन भविष्यात इंग्लंडसाठी खेळू शकतो.’’

स्टोन लेन हे गाव पाहण्यासारखे आहे. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात, ते पदार्थ येथेसुद्धा आपल्याला मिळतील. येथे बनवली जाणारा बाल्टिक नावाचा रस्सा म्हणजेच मसाला घालून केलेले मटन, जे संपूर्ण इंग्लंडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इंग्लिश लोक अजूनही स्टोन लेनमध्ये या रश्श्याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळेच स्टोन लेनला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु येथे आता अफगाणिस्तान आणि भारतीय लोकांची वस्तीदेखील वाढली आहे. सणासुदीला किंवा सुटय़ांमध्ये येथे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असे मुलांचे सामने होतात. मोईनच्या यशानंतर स्टोन लेन येथून आणखी काही क्रिकेटपटू घडतील, अशी आशा सर्वाना वाटते आहे.