इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

साऊदम्प्टन : डॉम सिबले आणि झॅक क्रावली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी चांगली सुरुवात केली होती. पण वेस्ट इंडिजच्या प्रभावी माऱ्यासमोर यजमान इंग्लंडचा डाव गडगडला. त्यामुळे दिवसअखेर इंग्लंडची १०० षटकांत ६ बाद २७६ अशी अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आता एकूण १६२ धावांची आघाडी आहे.

पहिल्या डावातील ११४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडने पहिल्या सत्रात विंडीजला दमदार प्रत्युत्तर दिले. डॉम सिबले आणि रॉरी बर्न्‍स यांनी ७२ धावांची सावध सलामी दिली. बर्न्‍स (४२) पाठोपाठ सिबले (५०) अर्धशतकी खेळी केल्यावर माघारी परतला. जो डेन्लीने २९ धावांवर परतीची वाट धरली.मग क्रावली आणि बेन स्टोक्स यांनी चौथ्या गडय़ासाठी ९८ धावांची भागीदारी रचली. पण स्टोक्स (४६), क्रावली (७६) व जोस बटलर (९) अवघ्या १६ धावांच्या अंतराने माघारी परतल्यामुळे इंग्लंडला चांगली सुरुवात करूनही फायदा उठवता आला नाही. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने क्रावली व बटलरला माघारी पाठवत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद २०४; ’  वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्व बाद ३१८; ’  इंग्लंड (दुसरा डाव) : १०० षटकांत ६ बाद २७६ (झॅक क्रावली ७६, डॉम सिबले ५०; अल्झारी जोसेफ २/४०)

(धावफलक अपूर्ण).