करोनाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन फुटबॉल संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय

जून-जुलैमध्ये होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धा करोनामुळे २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय युरोपीयन फुटबॉल संघटनेने (यूएफा) मंगळवारी घेतला.

युरो-२०२० स्पर्धा आता युरो-२०२१ होऊन ती ११ जून ते ११ जुलै २०२१ या कालावधीत खेळवण्याचा प्रस्ताव ‘यूएफा’ने मान्य केला आहे. त्यामुळे सध्या करोनामुळे स्थगित झालेल्या सर्व स्पर्धाना त्याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ‘यूएफा’ने ५५ संलग्न देशांच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही तातडीची आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. त्यानंतर युरो चषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा अंतिम निर्णय ‘यूएफा’च्या कार्यकारी समितीने घेतला, अशी माहिती स्वीडन फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कार्ल-एरिक निल्सॉन यांनी दिली. युरो चषकाच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.

युरो चषक स्पर्धा यंदा प्रथमच एका देशात न खेळवता युरोपातील विविध देशांतील १२ शहरांमध्ये खेळवण्यात येणार होती. उपांत्य आणि अंतिम लढत मात्र लंडनमध्येच होणार होती. आता स्पर्धेच्या कार्यक्रमपत्रिकेत कोणते बदल होतील, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोपा अमेरिका स्पर्धासुद्धा एक वर्ष पुढे ढकलली

अ‍ॅसूनशिऑन : अर्जेटिना आणि कोलंबिया येथे जूनमध्ये होणारी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा करोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. दक्षिण अमेरिका खंडामधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा १२ जून ते १२ जुलै या कालावधीत प्रथमच दोन देशांत होणार होती.