विश्वचषकात खेळणे हे कोणत्याही फुटबॉलपटूचे स्वप्न असते. मात्र सर्वच फुटबॉलपटूंचे हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. कालरेस टेवेझला अर्जेटिनाच्या संघात स्थान मिळालेले नाही. महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपल्याला संघातून डच्चू दिल्याचे दु:ख टेवेझ अद्याप विसरलेला नाही. निवड झाली नाही म्हणून विश्वचषकाकडे रीतसर दुर्लक्ष करणार असल्याचे टेवेझने ठरवले आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत उरुग्वेविरुद्ध पेनल्टीची संधी वाया दवडणाऱ्या ३० वर्षीय टेवेझला संघातून वगळण्याचा निर्णय अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनी घेतला. ‘‘मी कोणताही सामना पाहणार नाही, अर्जेटिनाचा संघ कशी कामगिरी करतोय याकडेही मी लक्ष देणार नाही. संघातील खेळाडूंशीही माझी काहीही बातचीत झालेली नाही. कोणाबद्दलही मला काहीही माहिती नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आहे. मी सध्या गोल्फ खेळतोय, मी फुटबॉलपटू आहे आणि या खेळाच्या सर्वोत्तम सोहळ्यात नसल्याने मला एकटे पडल्यासारखे वाटते आहे,’’ असे उद्विग्न टेवेझने पत्रकारांना सांगितले.
ज्युवेंटस संघाचे प्रतिनिधित्व करणारा टेवेझ यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने केलेल्या १९ गोलांच्या जोरावरच ज्युवेंट्स संघाने सेरी ए स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. टेवेझचे हे गेल्या सहा वर्षांतील चौथे जेतेपद आहे. मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व करताना २००८ आणि २००९मध्ये तर मँचेस्टर सिटीकडून खेळताना २०१२मध्ये टेवेझच्या संघाने जेतेपदाची कमाई केली होती. डच्चू दिल्याप्रकरणी टेवेझ भरभरून बोलत असताना प्रशिक्षक साबेला यांनी या प्रकरणी सूचक मौन बाळगले आहे. लिओनेल मेस्सी, गोन्झालो हिग्युएन, सर्जिओ अ‍ॅग्युरो आणि इझिक्वेल रॉड्रिगो पलासिओ या चौकडीवरच साबेला यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
अर्जेटिना फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ज्युलिओ ग्रोनडोना यांच्याबरोबर झालेला वाद, हे टेवेझला वगळण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे अर्जेटिनाचे महान खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी म्हटले होते. मात्र मॅराडोना यांच्या उद्गारात तथ्य नसल्याचे टेवेझने म्हटले आहे. ‘‘माझे कुणाशीही भांडण नाही. मी कोणालाही भेटलेलो नाही. मॅराडोना असे का म्हणाले मला कल्पना नाही. असल्या गोष्टींचा मला डच्चू देण्याशी काहीही संबंध नाही. हा सर्वस्वी प्रशिक्षकांचा निर्णय आहे,’’ असे त्याने सांगितले.