सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील ‘ड’ गटात बंगाल विरूद्धच्या सामन्यात मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. बंगालने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद १५३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने बंगालवर ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात बंगालचा खेळाडू मनोज तिवारी याने एक भन्नाट झेल टिपला. सामन्यात मुंबईची फलंदाजी सुरू असताना जय बिस्ता खेळत होता. तो ४० चेंडूत ४८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत होता. त्यावेळी शहाबाझ अहमदने त्याला चेंडू टाकला. चेंडू टोलवून अर्धशतक साजरं करण्याच्या इराद्याने त्याने चेंडू फटकावला. पण मनोज तिवारीने अत्यंत चपळाईने हवेत उडी घेत झेल टिपला.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना बंगलाचे सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी आणि विवेक सिंग दोघांनी दमदार खेळी केली. गोस्वामी २८ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. विवेक सिंगने मात्र अर्धशतक झळकावले. ४५ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने ५६ धावा केल्या. अभिमन्यू इश्वरन आणि मनोज तिवारी झटपट बाद झाले. शहबाझ अहमदने केलेल्या १५ चेंडूत २६ धावांच्या बळावर बंगालने १५३ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जय बिस्ता याने ४८ धावांची खेळी केली. आदित्य तरे ३७ धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर (१५) आणि सूर्यकुमार यादव (२२) या दोघांनाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना शुभम रांजणेने चौकार लगावत सामना मुंबईला जिंकवून दिला. त्याने १७ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या.