मॉस्को : रशियाचा माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक याने मंगळवारी व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. नेदरलँड्समधील विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

जवळपास तीन दशके व्यावसायिक बुद्धिबळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या क्रॅमनिकने १९९६ मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेत सर्वानाच अचंबित केले होते. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला होता. त्यानंतर त्याचा हा विक्रम नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने २०१० मध्ये मोडीत काढला. २००० साली ग्रँडमास्टर क्रॅमनिकने गॅरी कास्पारोव्हचे साम्राज्य मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला. त्यानंतर सात वर्षे त्याने जगज्जेतेपदाचा किताब आपल्याकडेच कायम राखला. २००७ मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने त्याच्याकडून जगज्जेतेपदाचा किताब हिसकावून घेतला. ४३ वर्षीय क्रॅमनिकने व्यावसायिक बुद्धिबळातील जवळपास सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या जेतेपदांवर नाव कोरले आहे.

मंगळवारी निवृत्तीची घोषणा करताना क्रॅमनिकने सांगितले की, ‘‘काही महिन्यांपूर्वीच व्यावसायिक बुद्धिबळ कारकीर्दीचा समारोप करण्याचा निर्णय मी घेतला होता. आता कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा खेळल्यानंतर मी तो जगजाहीर करत आहे. व्यावसायिक बुद्धिबळपटू म्हणून माझा प्रवास संस्मरणीय होता. मला सर्वकाही दिल्याबद्दल मी बुद्धिबळ या खेळाचा ऋणी आहे. काही क्षणी अपयशाचा तर काही वेळा यशाचा आनंद लुटताना मला मौल्यवान असा अनुभव मिळाला. माझ्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांत बुद्धिबळ खेळाडू म्हणून मिळणारे प्रोत्साहन लक्षणीयरीत्या कमी झाल्याने आता निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले होते.’’

‘‘गेल्या काही महिन्यांपासून मी शैक्षणिक क्षेत्रात तसेच लहान मुलांसाठीच्या बुद्धिबळ क्षेत्रात योजना विकसित करण्यावर अधिक भर देत होतो. लवकरच त्याविषयीची सविस्तर माहिती सर्वासमोर आणेन. यापुढेही मला जलद व ब्लिट्झ प्रकारात खेळायला आवडले असते. बुद्धिबळाला अधिक लोकप्रिय करण्यासाठी मी यापुढेही प्रयत्नशील राहीन,’’ असे क्रॅमनिकने सांगितले.

क्रॅमनिकविषयी थोडेसे..

ग्रँडमास्टर किताब       : १९९२

जगज्जेता       : २००० ते २००६ – २००७

फिडे रेटिंग      :      २७७७ (जानेवारी २०१९)

सर्वोत्तम रेटिंग  : २८१७ (ऑक्टोबर २०१६)

क्रमवारीतील स्थान       : ७ (जानेवारी २०१९)

सर्वोत्तम क्रमवारी : १ (जानेवारी १९९६)