इंडियन प्रीमियर लीगचा 2021 हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याद्वारे या स्पर्धेची सुरुवात होईल. सर्व संघांतील खेळाडूंनीही प्रशिक्षण सुरू केले आहे. दरम्यान, काही माजी खेळाडूंनी आयपीएलच्या हंगामाविषयी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसनेही आपले मत दिले आहे. स्टायरिसने ट्विटद्वारे व्यक्त केलेल्या संभाव्य क्रमवारीनुसार त्याने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अव्वल स्थान दिले आहे. तर, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला शेवटी ठेवले आहे. दुसर्‍या स्थानासाठी त्याने दिल्ली कॅपिटल्सची निवड केली. तर, तिसर्‍या क्रमांकावर पंजाब किंग्ज राहील असा अंदाज त्याने बांधला आहे.

 

स्टायरिसने सनरायझर्स हैदराबादला चौथ्या स्थानावर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाचव्या स्थानासाठी पसंती दिली आहे. मॉरिसची तंदुरुस्ती आणि जोफ्रा आर्चरचे पुनरागमन फायदेशीर ठरेल असे सांगून त्याने राजस्थान रॉयल्सला सहाव्या क्रमांकावर स्थान दिले. फलंदाजीचा अभाव असल्याचे सांगून त्याने कोलकाता नाईट रायडर्सला सातव्या क्रमांकावर स्थान दिले आहे.

स्टायरिसच्या या भविष्यवाणीनुसार, गुणतालिकेत तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आठव्या स्थानी असेल. या ट्विटवर स्टायरिसला चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. काही चाहत्यांना ही क्रमवारी आवडली नाही.

यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्स सहाव्या आणि सलग तिसर्‍या विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. तसेच चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचे चौथे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता नाइट रायडर्स या हंगामात आयपीएलच्या तिसर्‍या विजेतेपदासाठी खेळतील. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे आयपीएलच्या दुसर्‍या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्याच्या पहिल्या प्रयत्नात असणार आहे.