वेस्ट इंडिजच्या संघाचे माजी दिग्गज गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीचं कौतुक केलं आहे. योग्य पद्धतीने लाईन आणि लेन्थवर मारा करण्याची कला शमीला अवगत असल्यामुळे त्याची गोलंदाजी खेळणं कित्येकदा फलंदाजांना कठीण जात असल्याचंही होल्डिंग म्हणाले. “शमी कधीही फारसे वाईट चेंडू टाकत नाही. योग्य टप्प्यावर चेंडू ठेवणं त्याला जमतं म्हणूनच तो जगातील कोणत्याही फलंदाजाला बाद करु शकतो.”

गोलंदाजाकडे गती असणं अत्यंत गरजेचं आहे, मात्र या गतीवर योग्यवेळी नियंत्रण मिळवणंही गरजेचं असतं. शमी हा उंच गोलंदाज नाही, पण तो बऱ्यापैकी चपळ आहे. गतीवर योग्य नियंत्रण आणि चेंडू योग्य दिशेने वळवण्याची कला शमीला चांगलीच अवगत आहे. शमी कधीही लाईन आणि लेन्थ सोडून मारा करत नाही. एक गोलंदाज म्हणून तुम्ही सातत्याने एकाच टप्प्यावर योग्य लाईन आणि लेन्थवर मारा केलात तर फलंदाज अडचणीत येऊ शकतो. अडचणीच आल्यानंतर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज चुका करतो. मोहम्मद शमीची हा सर्वात मोठा गूण आहे.” होल्डिंग Sony Ten वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केलं आहे. यानंतरही हे लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याचे संकेत मिळालेले असून, यासाठी नवीन नियमावली घालून दिली जाणार असल्याचं कळतंय. या लॉकडाउनचा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्यामुळे भारतीय खेळाडू सध्याच्या काळात घरात बसून आहेत. मोहम्मद शमीही आपल्या उत्तर प्रदेशातील घरात राहून सराव करत आहे.