९२ वर्षांचे द्वंद्व विसरुन एकत्र; इंग्लंड-फ्रान्स यांचा मैत्रीपूर्ण लढतीद्वारे अभिनव निषेध *  जर्मनी-नेदरलँड्स समोरासमोर
पीटीआय, लंडन
फुटबॉल विश्वातले इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातले द्वंद्व सर्वश्रुत आहे. तब्बल ९२ वर्षांचा वारसा लाभलेल्या या संघांदरम्यान रंगणारा प्रत्येक मुकाबला अव्वल दर्जाच्या खेळाची अनुभूती देणारा. जिंकण्यासाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणाऱ्या या संघांनी वैरभावना बाजूला सारत मैत्रीपूर्ण लढत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. निमित्त आहे पॅरिसवर झालेला दहशतवादी हल्ला. दहशतवाद विरोधातली एकजूट दर्शवण्यासाठीच हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ बुधवारी मध्यरात्री एकत्र येणार आहेत.
फ्रान्स व जर्मनी यांच्यात फ्रेंच स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या फुटबॉल सामन्याचे वेळीच तीन दहशतवाद्यांनी स्टेडियमच्या बाहेर आत्मघातकी हल्ला केला होता. याच वेळी फ्रान्समधील पॅरिस येथे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १२९ जण ठार झाले होते. त्यामध्ये फ्रान्सचा खेळाडू लॅसाना दिआरा याच्या एक नातेवाइकाचा मृत्यू झाला. फ्रान्सचा आणखी एक खेळाडू अन्तोईन ग्रिझमन याची बहीण थोडक्यात बचावली.
इंग्लंड व फ्रान्स यांच्यात होणारा सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे व या सामन्याद्वारे दहशतवादी कृत्यांचा निषेधच केला जाईल, असे फ्रान्स फुटबॉल महासंघाने कळविले आहे. इंग्लंड संघाचे व्यवस्थापक रॉय हॉजसन यांनी सांगितले, ‘हा सामना आम्ही जरी गांभीर्याने खेळणार असलो तरीही फुटबॉलद्वारे सर्वाची एकी आहे हे आम्ही जगाला दाखवून देणार आहोत’.
या सामन्यासाठी ७० हजार प्रेक्षक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी सामना सुरू होण्यापूर्वी दोन तास अगोदर उपस्थित रहावे व सुरक्षा व्यवस्थेस सहकार्य करावे असे आवाहनही संयोजकांनी केले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमधील खेळाडू काळा पोशाख घालून फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहणार आहेत. सुरुवातीला फ्रान्सचे काही खेळाडू हा सामना खेळण्यासाठी तयार नव्हते, मात्र आता संघातील सर्व २३ खेळाडूंनी आपण खेळणार असल्याचे कळविले आहे. फ्रान्सच्या फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष नोएल लाग्रेट यांनी याबाबत सांगितले, सर्व खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास मान्यता दिली असून सर्वोत्तम खेळ करीत दहशतवादी हल्ल्याचा अभिनव पद्धतीने निषेध करण्याचे ठरविले आहे.
वेन रुनी याच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या खेळाडूंनीही सर्वोत्तम कौशल्य दाखवित या सामन्याद्वारे श्रद्धांजली वाहण्याचे ठरविले आहे. फ्रान्समध्ये अतिरेकी हल्ला झाला, त्या वेळी इंग्लंडचे खेळाडू स्पेनमध्ये सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यांनाही या हल्ल्याचा मोठा धक्का बसला आहे.