झ्वेरेव, नदाल, बेर्टेन्सची उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच

पॅरिस : फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचा माजी विजेता स्टॅनिस्लॉस वॉवरिंकाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास आणि सोफिया केनिन यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत मजल मारली. ‘लाल  मातीवरील बादशाह’ राफेल नदाल तसेच जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि किकी बेर्टेन्स यांनी आपापले सामने सहज जिंकत उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

ग्रीसच्या त्सित्सिपासचे ६-१, ६-२, ३-१ असे वर्चस्व असताना अल्जाझ बेडेने याने घोटय़ाच्या दुखापतीमुळे माघार घेतली. तीन ग्रँडस्लॅम विजेत्या वॉवरिंकाला नमवत फ्रान्सच्या ह्य़ुगो गॅस्टनने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तीन तास, १० मिनिटे रंगलेल्या तिसऱ्या फेरीच्या लढतीत गॅस्टनने २-६, ६-३, ६-३, ४-६, ६-० असा विजय मिळवला.

स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने इटलीच्या स्टेफानो ट्रॅव्हाग्लियाचा अवघ्या दीड तासात ६-१, ६-४, ६-० असा सहज फडशा पाडला. रशियाच्या आंद्रेय रुबलेव्हने दक्षिण आफ्रिकेच्या केनिन अँडरसनवर ६-३, ६-२, ६-३ असा विजय मिळवला. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने इटलीच्या मार्को चेचिनाटोचे आव्हान ६-१, ७-५, ६-३ असे परतवले.

महिलांमध्ये केनिनने रोमानियाच्या इरिना बाराला ६-२, ६-० असे सहज हरवले. हॉलंडच्या किकी बेर्टेन्सने चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोव्हावर ६-२, ६-२  असे निर्विवाद वर्चस्व गाजवले.

’ वेळ : दुपारी २.३० पासून

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ आणि एचडी वाहिन्या.

पहिली अरब महिला चौथ्या फे रीत

टय़ुनिशियाच्या ओन्स जबेऊर हिने बेलारूसच्या आर्यना साबालेंका हिचा ७-६ (९/७), २-६, ६-३ असा पराड्टाव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. फ्रेंच खुल्या स्पर्धेची चौथी फेरी गाठणारी जबेऊर ही पहिली अरब देशातील महिला टेनिसपटू ठरली आहे. पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर जबेऊर हिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. दुसरा सेट गमावल्यावर तिसऱ्या सेटमध्ये आपला खेळ उंचावत तिने बाजी मारली.