ICC World Cup 2019 या स्पर्धेसाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. पण बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आणि लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला मात्र या संघात एक महत्वाची उणीव जाणवली आहे.

”भारताच्या या संघामध्ये एका प्रतिभावंत वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन गोलंदाज उत्तम आहेत. पण त्यांना आणखी एका वेगवान गोलंदाजाच्या सहाय्याची गरज आहे. भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि विजय शंकर हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत जे वेगवान गोलंदाजी करू शकतात. पण त्यांच्या कामगिरीबाबत मी थोडा साशंक आहे. कारण शेवटी संघात कोणते ११ खेळाडू खेळतात यावर संघाची सगळी भिस्त असते, असे गंभीर म्हणाला.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव<br />युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा