बुंडेसलिगापाठोपाठ बायर्न म्युनिकने जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेचे विक्रमी विजेतेपद पटकावले. बायर्न म्युनिकने अंतिम लढतीत बायर लेव्हरक्युसेनला ४-२ असे नमवले.

रॉबर्ट लेवानडोस्कीच्या दोन गोलांसह डेव्हिड अल्बा आणि सर्जी नाब्री यांनी प्रत्येकी एक गोल केला. लेवानडोस्कीने याबरोबरच हंगामातील एकूण गोलांची संख्या ५० वर नेली. बायर्न म्युनिकचे हे जर्मन लीगचे २० वे विजेतेपद ठरले. ऑगस्टमध्ये चॅँपियन्स लीग जिंकून एका हंगामात तीन जेतेपदे पटकवण्याचा बायर्नचा प्रयत्न असेल.

बायर्न म्युनिकच्या घरच्या मैदानात एरवी ७५ हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. मात्र प्रेक्षकांशिवाय लढती खेळण्यात येत असताना जर्मन चषकाच्या अंतिम लढतीत अवघ्या ६९१ जणांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात जर्मन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जोकीम ल्यू यांचा समावेश होता. सप्टेंबरमध्ये नव्या हंगामाची सुरुवात होईल तेव्हा काही मोजक्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा जर्मन फुटबॉल अधिकाऱ्यांचा विचार आहे.