भारत-न्यूझीलंड ‘अ’ कसोटी मालिका

शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या (१०७) जोरावर भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील ९ बाद ३८६ धावांना उत्तर देताना १ बाद २३४ अशी दमदार मजल मारली. चार दिवसीय कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा गिलसह चेतेश्वर पुजारा ५२ धावांवर खेळत होता.

कर्णधार हनुमा विहारीच्या साथीने सलामीला आलेल्या गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. विहारीने ५९ धावा फटकावल्या. गिलच्या नाबाद खेळीत १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. भारत अजूनही १५२ धावांनी पिछाडीवर असून सामन्याचा एकच दिवस बाकी आहे.

पावसामुळे शनिवारचा दुसरा दिवस पूर्णपणे वाया गेला होता. दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर न्यूझीलंडने त्यांचा डाव घोषित केला. डॅरील मिचेल १०३ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून संदीप वॉरियर, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड ‘अ’ : १३१.५ षटकांत ९ बाद ३८६ (डॅरील मिचेल १०३, ग्लेन फिलिप्स ६५, डेन क्लेवर ५३, संदीप वॉरियर २/५०, मोहम्मद सिराज २/७५, आवेश खान २/८२, रविचंद्रन अश्विन २/९८) विरुद्ध भारत ‘अ’ : ५३ षटकांत १ बाद २३४ (शुभमन गिल नाबाद १०७, चेतेश्वर पुजारा नाबाद ५२, ब्लेअर टिकनेर १/७१)