मेसी आणि रोनाल्डो यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद हा फुटबॉलप्रेमींसाठी नवा नाही. फुटबॉल जगतात सध्या सर्वाधिक लोकप्रिय असे हे दोन खेळाडू आहेत. या दोघांच्या चाहत्यांमध्ये कायम वाद होत असतात. पण आता एका दिग्गज फुटबॉलपटूने यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात ब्राझीलचा महान खेळाडू पेले हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी रोनाल्डोपेक्षा मेसीला पसंती असल्याचे म्हटले आहे.

रोनाल्डो आणि मेसी यांच्यात तुलना होणे कठीण आहे. मेसीची खेळाची पद्धत ही रोनाल्डोपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. अनेकदा माझी तुलना जॉर्ज बेस्ट यांच्याशी करण्यात आली होती. पण आम्हा दोघांची खेळण्याची पद्धत ही वेगळी होती. रोनाल्डो हा सेन्टर फॉरवर्डचा खेळाडू आहे, तर मेसी हा अतिशय विचारपूर्वक मैदानात वावरणारा खेळाडू आहे. पण मला संघ निवडायची संधी मिळाली तर मी रोनाल्डोपेक्षा मेसीला संघात स्थान देईन, असे त्यांनी सांगितले.

आपल्या फुटबॉल कारकिर्दीबाबतही त्यांनी मन मोकळे केले. माझे वडील सेन्टर फॉरवर्ड पोझिशनवर उत्तम खेळायचे. माझ्या वडिलांनी मला फुटबॉल शिकवले. त्यांनी मला त्यांच्यापेक्षा किमान तिपटीने जास्त गोल करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला उत्तम फुटबॉल खेळता आले. ते माझे प्रेरणास्थान आहेत, असेही पेले यांनी नमूद केले.