टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पुनरागमन आता अनिश्चीत काळासाठी पुढे ढकललं गेलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. २०१९ च्या अखेरीस हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखापतीने ग्रासलं होतं. यानंतर त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रीयाही करण्यात आली. यामधून सावरुन आल्यानंतर हार्दिक बंगळुरुत NCA मध्ये आपला फिटनेस सुधारण्यावर भर देत होता. गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी यामुळे हार्दिक पांड्याची तुलना नेहमी माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी केली जाते. मात्र पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकच्या मते कपिल देव आणि हार्दिक पांड्या यांची तुलनाच होणं शक्य नाही.

“हार्दिक पांड्या चांगला खेळाडू आहे, तो आता आहे त्यापेक्षा अधिक चांगला अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. पण तो त्याच्या फिटनेसवर म्हणावं तसं काम करतोय असं मला नाही वाटतं. तुम्ही अधिकाधिक सराव केला नाहीत, तर तुमच्या अष्टपैलू खेळाडू असण्याला काहीच अर्थ उरत नाही. फिटनेससोबत त्याला मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. तो अनेकदा दुखापतग्रस्त झालेला आहे. जेव्हा खेळाडूला खूप पैसा मिळतो, तेव्हा तो थोडासा आळशी बनतो. प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत हीच गोष्ट असते. मोहम्मद आमिरही असाच…त्यानेही म्हणावा तितका सराव केला नाही..नंतर त्याची कामगिरी खालावत गेली.” अब्दुल रझाक पीटीआयशी बोलत होता.

हार्दिक आणि कपिल देव यांची तुलना करणं खूप उतावळेपणाचं ठरेल. कपिल देव, इम्रान खान हे सर्वोत्तम अष्टपैलू होते. हार्दिक यांच्या जवळपासही बसत नाही. माझ्या काळात मी सुद्धा चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचो, पण मी कधीही माझी तुलना इम्रान खान यांच्यासोबत केली नाही. कपिल देव, इम्रान खान हे खेळाडूच वेगळे होते, त्यांच्याशी तुलना करणं योग्य ठरणार नाही, रझाकने हार्दिक आणि कपिल देव यांच्या होणाऱ्या तुलनेवर आपलं मत मांडलं. अब्दुल रझाकने आपल्या कारकिर्दीत २६५ वन-डे, ४६ कसोटी आणि ३२ टी-२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे.