खेळाइतकेच पाकिस्तानचे क्रिकेटपटू अतरंगी कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात असतात. विश्वचषकासाठी सराव म्हणून पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. अष्टपैलू हॅरिस सोहेल या संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. मात्र सराव आणि क्रिकेटच्या ऐवजी हॅरिस सोहेलला भुताने गाठल्याने खळबळ उडाली आहे.
ख्राइस्टचर्च शहरातल्या ‘रायग्स लॅटिमेर’ नामक हॉटेलात पाकिस्तानच्या संघाचे वास्तव्य आहे. रात्री सर्व जण झोपेलेले असताना आपल्याला अमानवी शक्तीचा भास झाला, असा दावा हॅरिसने केला आहे. झोपेदरम्यान अचानक माझा पलंग हलल्याचे जाणवले. ते भूतच होते, असे हॅरिसने सांगितले. या प्रकाराने हादरलेल्या हॅरिसने संघसहकाऱ्यांना दूरध्वनी करत जागवले. थोडय़ाच वेळात संघातील बहुतांशी खेळाडू हॅरिसच्या खोलीत जमले आणि त्यांनी त्याला आधार दिला. संघव्यस्थापक मवीद अक्रम चीवा यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेतली. प्रशिक्षक वकार युनिस यांनी हॅरिसला आपल्या खोलीत नेले. उर्वरित रात्र त्याने युनिस यांच्या खोलीतच काढली.
या प्रकरणामुळे अस्वस्थ झालेल्या हॅरिसला तापही भरला. मात्र हा ताप सामान्य असून, हॅरिसची प्रकृती ठीक असल्याचे पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मात्र या प्रकरणाचा धसका घेतलेल्या हॅरिसने सरावही केला नाही आणि न्यूझीलंड अध्यक्षीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला खेळता आले नाही.
दरम्यान, हॉटेलच्या परिसरात भूत किंवा कोणतीही अमानवी शक्ती नसल्याचे रायग्स लॅटिमेर हॉटेलच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. ख्राइस्टचर्च शहराच्या मध्यवर्ती भागात हे हॉटेल वसले आहे. मात्र भूत किंवा अमानवी शक्तींनी ग्रासलेला हॅरिस पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि शेन वॉटसन या खेळाडूंनाही अशा स्वरुपाचे त्रास जाणवले होते.