क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँमधील वाद अद्यापही सुरु असून दरम्यान शमीच्या काकांनी हसीन जहाँवर नवे आरोप केले आहेत. मोहम्मद शमीचे काका खुर्शीद अहमद यांनी केलेल्या आरोपानुसार, हसीन जहाँला पैसे मिळवण्याचं वेड लागलं आहे आणि तिच्या नावे जास्तीत जास्त संपत्ती खरेदी केली जावी अशी तिची इच्छा आहे.

‘तिला फक्त पैशांची हाव होती. ती दर महिन्याला लाखाोंची खरेदी करत होती. आम्ही हसीनला वकिलाशी आणि तिच्याशी चर्चा करुन तोडगा काढू असं म्हटलं होतं. पण तिला तात्काळ तिच्या नावे संपत्ती घेतली जावी असं वाटत आहे. कदाचित तिने मोहम्मद शमीपासून वेगळं होण्याचा निर्णयही घेतला असता’, असं खुर्शीद अहमद यांनी म्हटलं आहे.

हसीन जहाँने सर्वात आधी आरोप केला होता की, शमीने दुबईत पाकिस्तानी तरुणी अलिश्बाची भेट घेतली होती. हसीनाने केलेल्या आरोपानुसार, अलिश्बाने मोहम्मद भाई नावाच्या एका व्यक्तीकडून पैसे घेऊन शमीला दिले होते. हसीनने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोपही लावला होता. मात्र नंतर तिने आपण मॅच फिक्सिंगचा आरोप केला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

हसीन जहाँच्या आरोपांना उत्तर देताना शमीने हसीन अर्ध्यापेक्षा जास्त आरोप सिद्ध करु शकणार नाही असा दावा केला आहे. ‘माझ्या पत्नीने माझ्यावर जितके आरोप केला आहेत, त्यापैकी अर्ध्याहून जास्त ती सिद्ध करु शकणार नाही. आता ती काय करते हे मला पहायचं आहे’, असं शमीने म्हटलं होतं.