विशाखापट्टणम : चेंडू सीमारेषेपार भिरकावून देणे, ही माझी प्रवृत्ती असून ती माझ्या नसानसांत भिनलेली आहे. त्यामुळेच षटकार ठोकताना समोर गोलंदाज कोण आहे, याचा विचार मी करीत नाही, अशा शब्दांत दिल्ली कॅपिटल्सचा युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २१ चेंडूंत ४९ धावांची खेळी करताना पंतने तब्बल पाच षटकार खेचले. याबाबत पंतने या सामन्याचे विश्लेषण केले. ‘‘ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये तुम्ही २० चेंडूंत ४० धावा करणे अपेक्षित असते. त्या परिस्थितीत तुम्हाला कोणत्या तरी एका गोलंदाजावर आक्रमण करावे लागते. त्यामुळेच समोर गोलंदाज कोण आहे, त्याचा विचार करत नाही.अशा सामन्यांमध्ये तुम्ही जेव्हा चांगले खेळत असता, तेव्हा सामना संपवूनच माघारी आले पाहिजे. विजयाच्या अगदी जवळ पोहोचलो असताना मी बाद झालो. मात्र, पुढील वेळी मी सामना संपवूनच माघारी परतेन,’’ असे पंत म्हणाला. कर्णधार श्रेयस अय्यरनेदेखील पंतची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ‘‘अखेरच्या षटकांमध्ये सामना खूपच रोमांचक झाला होता. ऋषभच्या फटकेबाजीमुळे आणि जिंकल्यानंतर सर्वाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद मी पाहात होतो,’’ असे श्रेयसने सांगितले.

ऋषभ सर्वोत्तम विजयवीर

दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा युवा क्रिकेटपटूंमधील सर्वोत्तम विजयवीर असल्याचे सलामीवीर पृथ्वी शॉ याने सांगितले. निर्णायक व दबावाच्या सामन्यातदेखील पंतने अप्रतिम कामगिरी बजावली. तो सामन्याच्या अखेरच्या क्षणी बाद झाला, हे दुर्दैवी होते. मात्र ऋषभ हा अफलातून फलंदाज आणि विजयवीर असल्याचे पृथ्वीने नमूद केले.