डॉ. प्रकाश परांजपे

पिंकी, पत्त्यांची पानं म्हणजे लिपस्टिकची नळी नाय, खेळ छोटं पान आणि चालू दे पुढे डाव, कोंडमारा अस होऊन छोटू कडाडला. झालं असं, छोटू डाव वाटत असताना आबांना फोन आला. पिंकीनं लगेच आबांची पानं हातात घेतली. छोटूने १ किलवर बोली देऊन लिलावाची सुरुवात केली. भातखंडे पास. पिंकीनं १२ चित्रगुणांची व्यवस्थित मोजणी करून १ बिनहुकुमीची बोली दिली. मेननच्या पासनंतर छोटूनं तडक ३ बिनहुकुमीची बोली दिली. सगळे पास बोलल्यानंतर ३ बिहू ठेका पक्का झाला. मेननने त्याच्या हातातील सगळ्यात लांब पंथाचं चौथं पान, म्हणजे इस्पिक छक्कीची भवानीची उतारी केली. छोटूने आपली पानं पटावर पसरली आणि पिंकीच्या वतीने डाव खेळायला तो पिंकीच्या मागे जाऊन उभा राहिला. छोटूचा ससेमिरा टाळण्यासाठी पिंकीनं तिची पानं मिटून ठेवली आणि ती विचार करू लागली.

‘‘अरे, पण गुलाम लावायचा की पंजी ते ठरवायला नको का?’’ पिंकीने विचारलं. भातखंडेंनी त्या प्रश्नाचं उत्तर शांतपणे दिलं. दस्ताचं दुसरं पान शक्यतोवर छोटंच खेळावं, हा ब्रिजमधला आणखीन एक ठोकताळा आहे. १०० पैकी ९८ वेळेला छोटं पान खेळून फायदाच होतो. सटीसामाशी कधी तरी दुसऱ्या हाती मोठं पान खेळणं बरोबर असतं, पण नवशिक्या खेळाडूंनी सर्वसामान्य ठोकताळे वापरावेत हेच श्रेयस्कर.

त्याचं ऐकून पिंकी इस्पिक पंजी खेळली. एवढय़ात आबा फोन संपवून परत आले. पिंकी मेननच्या मागे जाऊन बसली आणि खेळ नेहमीच्या तालात पुढे सुरू झाला. भातखंडेंनी इस्पिक राजा खेळून (तिसऱ्या हाती मोठं पान या ठोकताळ्याप्रमाणे) पाहिला दस्त जिंकला आणि उरलेल्या दोन पानांत इस्पिक नश्शी हे मोठं पान असल्यामुळे दुसऱ्या दस्ताला इस्पिक नश्शीची उतारी केली. आबांनी छोटं पान खेळल्यावर मेननने क्षणभर विचार केला आणि आपल्या हातातून इस्पिक चव्वी दिली. इस्पिक राणी जर भातखंडेकडे असती तर ती तो दुसऱ्या दस्ताला खेळला असता. त्यामुळे इस्पिक राणी आबांकडे आहे, हे मेनननं ताडलं होतं. त्याने इस्पिक एक्का घेतला असता तर पुढचा इस्पिकचा दस्त आबांनी जिंकला असता आणि उरलेली इस्पिकची पानं वाजवायला मेननच्या हातात उतारीच आली नसती. त्यामुळे दुसरा दस्त आबांना जिंकू देणं हेच योग्य होतं.

आबांनी दुसरा दस्त इस्पिक गुलामानं बघ्याच्या हातात जिंकला आणि पुढच्या दस्ताला बघ्याकडून एक छोटं किलवर खेळून तो दस्त हातात एक्कय़ाने जिंकला. चौथ्या दस्ताला आबांनी हातातून बदाम दश्शी लावली. गुलाम आणि पंजी हातात असताना मेननकाका काय खेळतात, हे बघायला पिंकी उत्सुक होती. मेनननं क्षणार्धात छोटं पान पटावर ठेवलं. आबांनी बदाम राजाने तो दस्त जिंकून बघ्याची उरलेली किलवर वाजवून घेतली. चौथ्या किलवरवर मेनननं एक चौकटचं पान जाळलं तर भातखंडेनं एक बदामचं पान जाळलं. शेवटी प-पू जोडीला दोन इस्पिक आणि चौकट राजा असे तीन दस्त मिळून ठेका एका दस्तानं बुडाला!

दस्ताच्या ‘दुसऱ्या हाती छोटं पान’ हा ठोकताळा पिंकीला एव्हाना व्यवस्थित समजला होता.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)