मर्यादित षटकांच्या सामन्यांद्वारे प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद मिळत असला, तरीही कसोटी हाच खरा क्रिकेटचा आत्मा आहे. या सामन्यामधील मानकरी खऱ्या अर्थाने ‘हीरो’ ठरतात. अधिकाधिक कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू महान खेळांडूंमध्ये मानले जातात असे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर यांनी सांगितले.

कानिटकर यांनी १९९८ मध्ये ढाका येथे झालेल्या रौप्यमहोत्सवी स्वातंत्रता चषक स्पर्धेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतास विजय मिळवून दिला होता. त्यांनी शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर सकलेन मुश्ताकला चौकार ठोकून भारतास विजेतेपद मिळवून दिले होते. कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने रणजी स्पर्धेत अनेक सामने जिंकले तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघानेही स्थानिक स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी केली होती. ते सध्या तामिळनाडू संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत.

महाराष्ट्र राज्याने देशास अनेक कीर्तिमान खेळाडू दिले आहेत. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. क्रिकेटमध्ये मला जे काही गौरवशाली स्थान मिळाले आहे त्याचे श्रेय माझे वडील हेमंत तसेच पुण्यातील अन्य गुरूंना द्यावे लागेल असे सांगून कानिटकर म्हणाले, गहुंजे येथील स्टेडियम खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांवर केवळ भारतीय खेळाडू नव्हे तर अन्य परदेशी खेळाडूही खूश असतात.

ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडूंनी यापूर्वी भारतात अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. स्टीव्हन स्मिथ, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आदी खेळाडूंनी आयपीएल स्पर्धामध्ये सातत्याने चमक दाखविली आहे. त्यामुळेच भारतीय हवामान, खेळपट्टी व प्रेक्षक हे त्यांना नवीन नाहीत. हे लक्षात घेतले तर ऑस्ट्रेलियास हरविणे हे सोपे नाही. भारताने या मोसमात न्यूझीलंड, इंग्लंड व बांगलादेश यांच्याविरुद्ध विजय मिळविताना प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताचे पारडे निश्चित जड राहणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू जिगरबाज खेळाडू आहेत व ते शेवटपर्यंत झुंज देत सामन्यास कलाटणी देण्याबाबत ख्यातनाम आहेत. साहजिकच त्यांच्याविरुद्धचे सामने प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी ठरणार आहे असेही कानिटकर यांनी सांगितले.

कानिटकर पुढे म्हणाले, कसोटी सामना म्हणजे खेळाच्या परिपूर्ण कौशल्याची परीक्षा घेणारी लढत असल्यामुळे या सामन्याद्वारे युवा खेळाडूंनी भावी कारकीर्दीसाठी प्रेरणा घेतली पाहिजे.