ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही आपले कौशल्य सिद्ध करून दाखवलेला भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा धरमशाला कसोटीत सामनावीरासह मालिकावीराच्या पुरस्काराचाही मानकरी ठरला. भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर करंडक २-१ अशा फरकाने जिंकला. आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे जडेजा सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात म्हणाला. जडेजाने मालिकेत २३ विकेट्स तर घेतल्याच पण फलंदाजीतही जोरदार फटकेबाजी केली. तळाच्या क्रमवारीत चांगली फलंदाजी करून जडेजाने संघाच्या धावसंख्येत भर घालण्याचे योगदान दिले. धरमशाला कसोटी तर त्याने वृद्धीमान साहासोबत केलेल्या भागीदारीमुळे सामन्यात संघाला आघाडी घेता आली.

जडेजा म्हणाला की, ”जेव्हा तुम्ही क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या संघातील खेळाडू म्हणून खेळत असता तेव्हा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. फलंदाजीवेळी मी अतिशय संयमाने आणि एकाग्रतेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. उलट मॅथ्यू वेडकडून सुरू असलेल्या स्लेजिंगमुळे मला प्रोत्साहनच मिळाले. त्याच्या स्लेजिंगला मी धावांच्या रुपात प्रत्युत्तर देऊ शकलो तर ते उत्तम प्रत्युत्तर ठरेल याची कल्पना मला होती. त्यामुळे चांगली खेळी करू शकलो. संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधाराने माझ्यात मोठी खेळी करण्याचे कसब आहे, असा विश्वास माझ्यावर ठेवला.”

 

अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर हातातील बॅटने ‘तलवारबाजी’ करून हाफसेंच्युरी सेलिब्रेट करण्याची जडेजाची स्टाईल देखील आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. याबाबत रवि शास्त्री यांनी जडेजाला शतक गाठल्यानंतर तू कशा पद्धतीने सेलिब्रेशन करशील याची उत्सुकता आम्हाला आहे असा प्रश्न विचारला. त्यावर जडेजा म्हणाला की, काही महिन्यांपूर्वी लोक मला कसोटी खेळाडू म्हणून स्विकारण्यास तयार नव्हते. यंदाची कसोटी मालिका ही त्यांच्यासाठी प्रत्युत्तर देणारी ठरली आहे. अश्विन आणि मी प्रतिस्पर्धी संघावर दोन्ही बाजूंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्पिनर आणि डावखुरा फिरकीपटू ही जोडी खरंच फायदेशीर आहे. देशाबाहेरही अशीच कामगिरी करू आणि पुढच्या वेळी मी नक्कीच शतक ठोकण्याचा प्रयत्न करेन. शतक साजरं करताना दोन्ही हातात बॅट घेऊन ‘तलवारबाजी’ करेन, असं जडेजा मिश्किलपणे म्हणाला.