दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (४६) आणि मिचेल स्टार्क (२९) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ २२३ धावाच केल्या आणि इंग्लंडला २२४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी शतकी सलामी दिली. त्यानंतर बेअरस्टो माघारी परतला. पाठोपाठ जेसन रॉयलाही बाद ठरवण्यात आले. पण आपण बाद नसल्याचे सांगत त्याने थेट पंचांशी भर मैदानातच राडा घातला.

इंग्लंड चांगल्या स्थितीत असताना त्यांना दुसरा धक्का बसला. ६५ चेंडूत ८५ धावांवर खेळताना जेसन रॉयला बाद ठरवण्यात आले. कमिन्सने उसळत्या चेंडूवर त्याचा बळी घेतला. पण रिप्लेमध्ये तो बाद नसल्याचे स[स्पष्ट दिसून आले. पंचांनी बाद दिल्यानंतर त्यांच्याशी वाद घालतच तो मैदानाबाहेर गेला. बेअरस्टोच्या वेळी रिव्ह्यू गमावल्यामुळे रॉयला DRS चा आधार घेता आला नाही.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. पंचांच्या निर्णयावर फिंचने रिव्ह्यू घेतला मात्र तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. ऑस्ट्रेलियाकडून दमदार कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. तो २ चौकार लगावून ९ धावांवर बाद झाला. नवखा पीटर हँड्सकॉम्ब १२ चेंडूत ४ धावा काढून माघारी परतला. वोक्सने त्याला त्रिफळाचित केले.

१४ धावांवर ३ गडी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी सावरले. या दोघांनी अत्यंत सावध खेळी करत १४ व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली. स्मिथच्या साथीने अलेक्स कॅरीने चांगली भागीदारी केली. पण अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यावर कॅरी झेलबाद झाला. ७० चेंडूत ४ चौकारांसह ४६ धावा केल्या. कॅरी पाठोपाठ मार्कस स्टॉयनीस आदिल रशिदच्या फिरकीचा शिकार ठरला. २ चेंडूत तो शून्यावर पायचीत झाला. ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडत असताना स्टीव्ह स्मिथने झुंजार खेळी करत ७२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. फटकेबाज खेळी करण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार खेचत २३ चेंडूत २२ धावांवर तो माघारी परतला. अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स स्वस्तात माघारी परतला. त्याने १० चेंडूत ६ धावा केल्या. एकीकडे गडी बाद होताना स्टीव्ह स्मिथने झुंजार ८५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण चोरटी धाव घेताना स्मिथ धावबाद झाला. पाठोपाठ मिचेल स्टार्कदेखील २९ धावा काढून माघारी परतला.