भारत आणि विंडीज यांच्यात होणाऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी अत्यंत संथ सुरुवात करून पहिले ५ षटके खेळून काढली. त्यानंतर जेव्हा रोहित शर्माने फटकेबाजीचा प्रयत्न केला. त्यावेळी षटकात दमदार फटकेबाजी केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर केमार रोचने बळी टिपला. त्यानंतर भारताला भरधाव वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. या दरम्यान धोनीला नशिबाची साथ मिळाल्याने त्याला एक जीवदान मिळाले.

३३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. धोनीने फॅबियन ऍलन याने टाकलेला चेंडू पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू खेळता आला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षक शाय होप याच्या हातात गेला. धोनी बाद होणार असे वाटत असतानाच होपचा प्रचंड गोंधळ झाला. धोनीला नशिबाची साथ मिळाली आणि होपच्या हातून संधी निसटली. इतकेच नव्हे तर त्यानंतर विराट आणि धोनीने मिळून एक चोरटी धाव देखील घेतली.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अत्यंत सावध सुरुवात केली. पण रोहितने फटकेबाजी करण्यास सुरुवात करताच केमार रोचने त्याचा अडसर दूर केला. भारताचा रोहित शर्मा १ चौकार आणि १ षटकार खेचून १८ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यावर विराट कोहलीच्या साथीने सलामीवीर राहुलने सावध खेळ करण्यास सुरुवात केली आणि ११ व्या षटकात भारताचे अर्धशतक साकारले.

सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक मात्र २ धावांनी हुकले. त्याने ६ चौकार लगावत ६८ चेंडूत ४८ धावा केल्या. पण कर्णधार जेसन होल्डरने त्याला त्रिफळाचीत केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला विजय शंकर १४ धावांवर बाद झाला. यात त्याने ३ चौकार खेचले होते. पण केमार रोचने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. या दरम्यान कॅप्टन कोहलीने ५६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. विराटचे कोहलीने अर्धशतक केल्यानंतर लगेचच केदार जाधव माघारी परतला. १० चेंडूत त्याने केवळ ७ धावा केल्या. या खेळीत त्याने १ चौकार लगावला. पण विजय शंकर प्रमाणेच केदारदेखील केमार रोचच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाकडे झेल देत बाद झाला. धोनी आणि विराट यांच्यात भागीदारी होत असताना कर्णधार कोहली तंबूत परतला. धोनीच्या संथ खेळीमुळे विराट कोहलीला फटकेबाजी करणे क्रमप्राप्त ठरले. तशातच तो फटका खेळून बाद झाला. त्याने ८ चौकार खेचत ८२ चेंडूत ७२ धावा केल्या.