ICC च्या कसोटी क्रमवारीत तब्बल १३ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू गोलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. ICC ने कसोटी क्रमवारीची ताजी यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने अव्वल स्थान पटकावले आहे. मुख्य बाब म्हणजे या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा २००६ साली कसोटी क्रमवारीत अव्वल होता. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला ही कामगिरी करता आली.

पॅट कमिन्सने ८७८ गुणांची कमाई करत इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकले. या यादीत १३ वर्षांच्या कालावधीत माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन याने २००९ मध्ये दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. हीच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. दरम्यान, सध्या अँडरसन ८६२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या रबाडाची दोन स्थानांची घसरण होऊन तोही तिसऱ्या स्थानी (८४९) फेकला गेला आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली हा ९९२ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर संयमी चेतेश्वर पुजाराही तिसऱ्या स्थानी कायम आहे.