अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात इंग्लंडने तुफान फटकेबाजीच्या जोरावर ३९७ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार मॉर्गनच्या १४८ धावा आणि सलामीवीर बेअरस्टो (९०), जो रूट (८८) यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानला ३९८ धावांचे आव्हान दिले.

या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. याचा सर्वाधिक फटका फिरकीपटू रशीद खानला बसला. रशीद खानने सर्वाधिक म्हणजेच ९ षटकात चक्क ११० धावा खर्चिल्या. एखाद्या फिरकीपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक धावा खर्च करण्याची हि पहिलीच वेळ ठरली. याशिवाय विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात रशीद खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला. तसेच गोलंदाजाने सर्वात जलद १०० धावा खर्च करण्याचा नकोसा विक्रमही त्याने केला. त्याने ८.१ षटके म्हणजे ६५ चेंडूत १०० धावा खर्चिल्या आणि त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी केली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार यांच्या मदतीने ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली.

अफगाणिस्तानकडून दौलत झादरान आणि गुलाबदिन नैब या दोघांनी ३ -३ गडी बाद केले.