भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा पुढचा सामना १६ जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघ आपल्या पद्धतीने तयारी करत आहेत. त्यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिस याने भारताविरुद्ध सामना जिंकण्याचा एक ‘प्लॅन’ पाकिस्तानी खेळाडूंना सांगितला आहे.

“जर पाकिस्तानला या स्पर्धेतील आपले आव्हान भक्कम करायचे असेल, तर त्यांना भारताविरुद्धच्या सामन्यात आपला ‘अ’ दर्जाचा म्हणजेच अव्वल खेळ करावा लागेल. उत्कृष्ट प्रतीचा खेळ केला तरच पाकिस्तानला भारताविरुद्धचा सामना जिंकता येईल. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमीच ‘हाय-व्होल्टेज’ असतो. या वेळी हा सामना अधिक रंगतदार असेल यात वादच नाही. ICC च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला ज्या पद्धतीने नमवले होते, त्या पद्धतीचा खेळ करणे आवश्यक आहे. हा सामना खेळताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी अत्यंत सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरायला हवे”, असे वकार युनिस म्हणाला.

“भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपला ठेवणीतला खेळ खेळणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत झालेल्या सामन्यांत जो संघ डावाच्या सुरुवातीला झटपट गडी टिपू शकलेला नाही, त्या संघाला सामन्यावर पकड मिळवणे अवघड गेले आहे. नवा चेंडू हा महत्वाचा असतो. त्यामुळे सलामीच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी करायला हवी. भारताचे सुरुवातीचे गडी लवकर बाद करणे हे महत्वाचे आहे”, असा कानमंत्र वकारने पाकला दिला.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तणावपूर्ण झाल्याचे दिसून आले. भारताने विश्वचषक सामन्यात पाकिस्तानशी खेळू नये असा सूर भारतीयांमध्ये उमटला. पण सर्व सामने हे वेळापत्रकानुसारच होतील, असे ICC ने स्पष्ट केले. त्यानंतर अखेर १६ जूनला भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांसमोर उभा ठाकणार आहे.