ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हटले की, फलंदाजांसाठी नंदनवन.. आणि विश्वचषक म्हणजे तर क्रिकेटरसिकांसाठी खमंग मेजवानी. गगनचुंबी फटकेबाजांच्या निवडीवर जास्त भर या प्रकारच्या क्रिकेटमध्ये असतो. फक्त १२० चेंडूंमध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला भले मोठे आव्हान द्यावे लागते आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठीा खेळाडूला फटकेबाजी करणे आवश्यक असते. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील खेळाडूंपासून दमदार खेळीची अपेक्षा सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना नक्कीच असणार आहे. यंदाच्या विश्वचषकातील संघात काही गाजलेल्या खेळाडूंचा समावेश आहे जे प्रत्येक चेंडूनंतर धावफलकावर धावांचा आलेख उंचावत राहतात.

भारतीय संघात फटकेबाजांची कमी नाही. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणेसारख्या फटकेबाजांचा समावेश आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, ओमर अकमल, इंग्लंडचा ईऑन मॉर्गन, दक्षिण आफ्रिकेचा जीन-पॉल डय़ुमिनी, ए बी डी’व्हिलियर्स व मॉर्नी मॉर्केल, वेस्ट इंडिजचा मार्लन सॅम्युअल्स, अफगाणिस्तानचा मोहम्मद शाहजार हे सारे एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज. या साऱ्यांची प्रतिमा ही धडाकेबाज फटकेबाज म्हणून लोकप्रिय आहे. कमी चेंडूंत जास्त धावा काढण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये असल्यानेच आयपीएलसाठी या फटकेबाजांना कोटय़वधी रुपयांमध्ये खरेदी केले जाते. आतापर्यंत विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकली, तर सर्वाधिक धावा काढण्याचा मान न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमला जातो. फटकेबाजीच्या त्याने ७१ सामने खेळून २१४० धावा काढल्या आहेत. त्यात तब्बल १९९ चौकार व ९१ षटकारांचा समावेश आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आहे.

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात फटकेबाजीशिवाय विजय मिळणे कठीण आहे, हे एक सूत्रच बनले आहे. यंदाच्या विश्वचषकात अनेक खेळाडूंपासून दमदार खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या विश्वचषकात १९ सप्टेंबर २००७ या दिवशी इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराज सिंगने ६ चेंडूंत ६ षटकार ठोकले होते. तोच हा युवराज कर्करोगासारख्या आजारावर मात करून यंदा पुन्हा आपल्या शानदार फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकणार आहे.

विराट कोहली युवा क्रिकेट विश्वचषकापासूनच क्रिकेटविश्वाला परिचित आहे. कोहली आतापर्यंत ३५ ट्वेन्टी-२० सामने खेळला असून त्याच्या नावे अद्याप शतक नसले तरी १३३चा स्ट्राइक रेट आहे. शिवाय भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अनेकदा पराभवापासून भारताला विजयाकडे नेले आहे. त्याच्या नावे अनेक विक्रम असून ‘हेलिकॉप्टर शॉट’सारखी फटकेबाजी करून नवनवे प्रयोग करण्यात तो पारंगत आहे. १९८ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४४९० धावा धोनीच्या नावावर आहेत. मधल्या फळीत फलंदाजी करणारा धोनी ‘गेट्र फिनिशर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात धोकादायक खेळाडू आहे. मॅक्सवेलला स्थिरावयाला वेळ लागत नाही. अगदी पहिल्या बॉलपासून फटकेबाजीला सुरुवात करण्याची क्षमता त्याच्यात आहे. आतापर्यंत सर्वाधिक आक्रमक फलंदाजी ही त्याने ट्वेन्टी-२०मध्येच केली आहे. तसाच वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलही बेधडक फलंदाज आहे. उंची आणि बलाढय़ शरीराचा फायदा त्याला चांगलाच होतो. स्टेडियमच्या छतावर षटकार मारण्यात त्याचा विशेष हातखंडा आहे. ट्वेन्टी-२०मध्ये त्याच्या नावे सात शतके असून सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. त्याने अवघ्या ६६ चेंडूंत १७५ धावा काढल्या आहेत.  १२५ चा स्ट्राइक रेट असणारा दक्षिण आफ्रिकेचा डी’व्हिलियर्स ३६० अंशात कोणताही फटका खेळू शकतो.

विंडीजचा डेरॅन सॅमी हा कमी षटकांत सामन्याला विजयाचे स्वरूप देण्यासाठी ओळखला जातो. समोरच्या गोलंदाजाला कळायच्या आत चेंडू मदानाबाहेर तो भिरकावतो. दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलरसुद्धा ट्वेन्टी-२० प्रकारातील घातक फलंदाज मानला जातो. त्याने आयपीएलच्या सामन्यांमध्ये पंजाबकडून खेळताना ३८ चेंडूंत नाबाद १०१ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या फटकेबाजीने अनेक गोलंदाजांची लय बिघडवली आहे. तो आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. ‘बूम बूम’ आफ्रिदीच्या चाहत्यांची संख्या आजही तितकीच आहे. आफ्रिदीच्या बळावर पाकिस्तानने आजवर अनेक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रलियाचा सलामीवीर आरोन फिन्चकडूनही  विश्वचषकामध्ये  भरपूर अपेक्षा आहेत. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या आशिया चषक स्पध्रेत अनेक खेळाडूंनी वेगवान आणि दर्जेदार क्रिकेट काय असते, हे दाखवून दिले.

उत्तम खेळींच्या बळावर भारतीय खेळाडूंनी आशिया चषक काबीज केला. आशिया चषक हा जणू विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी एका प्रकारचा सरावच होता. ट्वेन्टी-२०ने अल्पशा काळात लोकप्रियतेचे शिखर गाठले असून यंदाचा विश्वचषकावर कोणता देश आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरेल, याकडे   क्रिकेटशौकिनांचे लक्ष लागले आहे.