करोना व्हायरसमुळे फटका बसलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सुमारे चार महिन्यांच्या कालावधीनंतर ८ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तसेच जुलै महिन्यात नियोजित असलेली भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकादेखील ऑगस्ट महिन्यात खेळण्यात येण्याची शक्यता आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नव्या नियमानुसार हे सर्व सामने किमान काही कालावधीपुरते विनाप्रेक्षक खेळवले जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा एक भाग म्हणून असा निर्णय घेण्यात आला आहे. यावरही ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने उपाय सुचवला आहे.

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या 100 MB या अ‍ॅपच्या माध्यमातून ब्रेट ली याने सचिनशी संवाद साधला. त्यावेळी या दोघांनी क्रिकेटमधील विविध बदलांवर चर्चा केली. तसेच नव्या नियमांबाबत काही उपायही सुचवले. स्टेडियममधील सामने हे विनाप्रेक्षक अगदीच कंटाळवाणे वाटण्याची शक्यता लक्षात घेता ब्रेट ली ने यावर एक झकास उपाय सुचवला. “भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत तरी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळणे सुरू व्हायला हवं. जर सामना सुरू असताना प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळाली नाही, तर ही बाब खूपच अवघड होऊन बसेल. कारण मी जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा प्रेक्षकांच्या आवाजातून मला खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळायची. त्यामुळे मैदानात प्रेक्षक नसतील, तर त्या जागी स्पीकरच्या सहाय्याने प्रेक्षकांचा आवाज वाजवून प्रेक्षक असल्याचा भास निर्माण करता येऊ शकतो”, अशी कल्पना ब्रेट ली याने सुचवली.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरपासून नियोजित करण्यात आला असून १७ जानेवारीपर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलियात असणार आहे. यात भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसह टी २० विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे. पण गेले काही दिवस टी २० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता असल्यानेहा दौरा अद्याप तरी निश्चित समजू नये असे BCCI ने सांगितले आहे. ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम हा खूप आधी ठरवण्यात आला होता. त्यावेळी टी २० विश्वचषक स्पर्धा खेळवण्याबाबत कोणतीही साशंकता नव्हती, पण आता जर ICC यंदाच्या वर्षी विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार नसेल, तर ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात जाऊन परत येणे आणि परत डिसेंबरला ऑस्ट्रेलियात जाणे या प्रवासाला काय अर्थ आहे?”, असा प्रश्न BCCI ने उपस्थित केला आहे.