ढाका : सलामीवीर इमरुल कायेसने झळकावलेल्या अप्रतिम शतकाच्या बळावर बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २८ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने दिलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाला संपूर्ण ५० षटकांत नऊ फलंदाजांच्या मोबदल्यात २४३ धावाच करता आल्या. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना इमरुलने एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करताना १४० चेंडूंत १३ चौकार व सहा षटकारांच्या साहाय्याने १४४ धावा केल्या. मोहम्मद सैफुद्दीनने त्याला कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत सुरेख साथ दिली. त्यामुळे बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत आठ फलंदाजांच्या मोबदल्यात २७१ अशी भक्कम धावसंख्या उभारली.

झिम्बाब्वेतर्फे सिन विल्यम्स (५०) आणि कायले जर्विस (३७) यांनी कडवी झुंज दिली. मात्र ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. मेहदी हसनने बांगलादेशतर्फे सर्वाधिक तीन बळी मिळवले. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ५० षटकांत ८ बाद २७१ (इमरुल कायेस १४४, मोहम्मद सैफुद्दीन ५०; कायले जर्विस ४/३७) विजयी वि.

झिम्बाब्वे : ५० षटकांत ९ बाद २४३ (सिन विल्यम्स ५०, कायले जर्विस ३७; मेहदी हसन ३/४६).