भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका ३ डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात रंगणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. पण टी २० विश्वचषक स्पर्धेबाबत अंतिम निर्णय झाल्यावरच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत निश्चित सांगता येईल, असे BCCI कडून सांगण्यात आले. सध्या दोन्ही देशांचे चाहते आणि माजी खेळाडू या मालिकेसाठी उत्सुक आहेत. या दौऱ्यावर प्रत्येक भारतीय खेळाडूच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. या मालिकेबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

स्टीव्ह वॉ इंडिया ग्लोबल वीक २०२० कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला होता. त्यावेळी तो म्हणाला, “बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका म्हणजे एक प्रकारे अ‍ॅशेस मालिकेसारखीच आहे. दोन्ही संघातील प्रतिभावान खेळाडूंचा दर्जा हे वेळोवेळी सिद्ध करतो. कसोटी सामना बरोबरीत सुटणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात महान सामना होता. कोलकाता येथे झालेला पराभव माझ्या अजूनही लक्षात आहे. भारत खूपच छान देश आहे. मी १० वर्षांच्या काळात जेव्हा-जेव्हा भारतात आलो, तेव्हा मला खूप बदल जाणवले. मी प्रत्येक वेळी गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहायचो, तेव्हा नवं काहीतरी दिसायचं आणि हळूहळू मी भारताच्या प्रेमात पडलो. क्रिकेटच्या माध्यमातून माझं भारताशी एक वेगळंच नातं जुळलं.”

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायननेही अशीच भावना व्यक्त केली होती. ‘‘माझ्यासाठी जितके अ‍ॅशेसचे महत्त्व आहे, तितकीच भारताविरुद्धची कसोटी मालिकासुद्धा महत्त्वाची आहे. किंबहुना दोन्ही मालिकांमध्ये चाहतेही तितकाच उत्साह दाखवतात. दोन वर्षांपूर्वी भारताने आम्हाला आमच्याच मायभूमीत धूळ चारली. मात्र या वेळी आमचा संघही समतोल असून गेल्या दोन वर्षांत आमची कसोटीतील कामगिरी उंचावली आहे. त्यामुळे या वेळी भारताविरुद्धची मालिका खेळण्यासाठी संपूर्ण संघ उत्सुक आहे,’’ असे लायनने म्हटलं होतं.