आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडची तिसऱ्या क्रमांकाची जागा कोण चालवणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र चेतेश्वर पुजाराने अगदी थोड्या वेळातचं या जागेवर आपलं नाव पक्क केलं. तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे अनेकांनी पुजाराची तुलना राहुल द्रविडशी करायला सुरुवात केली. अॅडलेडच्या मैदानावर आज भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या डावातील शतक आणि दुसऱ्या डावाता झळकावलेलं अर्धशतक यासाठी चेतेश्वर पुजाराला सामनावीर किताबाने गौरवण्यात आलं. मात्र या कसोटीतील चेतेश्वरने केलेल्या खेळीमुळे एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

२००३ साली भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटी सामन्यात राहुल द्रविडने पहिल्या डावात २३३ धावांची द्विशतकी खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळल्यानंतर द्रविडने दुसऱ्या डावात नाबाद ७२ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हा कसोटी सामना ४ गडी राखून जिंकला होता. या खेळीसाठी राहुल द्रविडला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर आज १५ वर्षांनी त्याच मैदानावर चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडसारखी कामगिरी करत सामनावीराचा किताब पटकावला आहे. बीसीसीआयने या प्रसंगाचं ट्विट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.