भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे सुरु आहे. या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय फलंदाजांनी आपल्या बेजबाबदार खेळीने चुकीचा ठरवला. या सामन्यात केवळ चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली आणि भारताला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.

पुजाराने २३९ चेंडूत ६ चौकारांच्या आणि १ षटकाराच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. एकीकडे भारताचे इतर फलंदाज बाद होत असताना पुजाराने मोठे फटके मारण्याचा मोह आवरला. त्यामुळे पुजाराने शतक झळकावले. पुजाराच्या या अप्रतिम खेळीमुळे पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पा गाठला. १२३ धावांवर तो बाद झाला. त्यामुळे त्याच्या आता ५०२८ कसोटी धावा आहेत. ५ हजार कसोटी धावा करणारा पुजारा १२ वा भारतीय खेळाडू ठरला.

 

तसेच पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या.

या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. यादीतील १२ खेळाडूंपैकी विराट कोहली आणि पुजारा हे दोनच खेळाडू सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. विराट यादीत ८ व्या स्थानी असून त्याच्या ६३३४ कसोटी धावा आहेत.