ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा दुसरा टी २० सामना ७ गडी राखून जिंकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने तुफानी खेळी केली आणि दमदार शतक ठोकले. भारताने दिलेले १९१ धावांचे मोठे लक्ष्य त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ चेंडू राखून पार केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांची टी २० मालिका २-० अशी जिंकली.

१९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ११ चेंडूत ७ धावांची सावध खेळी करणारा मार्कस स्टॉयनीस त्रिफळाचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्याने १ चौकार लगावला. चांगल्या लयीत नसलेल्या कर्णधार फिंचला आजही अपयश आले. तो ८ धावांवर बाद झाला. त्याने केवळ १ चौकार लगावला. त्यानंतर मॅक्सवेल मैदानात आला आणि त्याने शॉर्ट बरोबर दमदार फटकेबाजीत सुरुवात केली. त्याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले तर ५० चेंडूत शतक ठोकले. जोरदार फटकेबाजी करणारा डार्सी शॉर्ट ४० धावांवर झेलबाद झाला. मात्र मॅक्सवेल अजिबात थांबला नाही. त्याने तडाखेबाज नाबाद ११३ धावांची खेळी केली. ५५ चेंडूच्या या खेळीत त्याने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकले. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले. त्याने आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील तिसरे शतक लगावले.

दरम्यान, त्या आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राहुलचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात हुकले. तो २६ चेंडूत ४७ धावांची फटकेबाज खेळी करून बाद झाला. रोहितच्या जागी संधी मिळालेल्या शिखर धवनने सुरुवात चांगली केली मात्र तो २४ चेंडूत १४ धावा करून झेलबाद झाला. पहिल्या सामन्यात धावबाद झालेल्या ऋषभ पंतने या सामन्यात फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात अपयश आले. ६ चेंडूत १ धाव करून तो झेलबाद झाला. पण त्यानंतर कोळी आणि धोनीने डाव सावरत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ३ चेंडूत ३ षटकार मारून कोहलीने फटकेबाजीची सुरुवात केली. त्यानंतर १ धाव काढत त्याने आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. धोनीनेही त्याच्या सुरात सूर मिसळून तडाखेबाज खेळी केली. शेवटच्या षटकात धोनी २३ चेंडूत ४० धावा फटकावून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावला. दिनेश कार्तिकनेही शेवटच्या ३ चेंडूंमध्ये २ चौकार हाणले. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत कोहलीने भारताला १९० धावांपर्यंत पोहोचवले. कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या. केवळ ३८ चेंडूत त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारून तुफानी खेळी केली.