भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. १० नोव्हेंबरला तिसरा सामना होणार आहे.

सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम(३६), सौम्या सरकार(३०) आणि मोहम्मदुल्लाह(३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.

या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Live Blog

22:43 (IST)07 Nov 2019
भारताने विजय मिळवत मालिकेत केली बरोबरी

रोहित शर्मा बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी केली.  १३ चेंडूत नाबाद ३ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २४ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताने ८ गडी आणि २६ चेंडू राखून बांगलादेशवर विजय मिळवला.




22:06 (IST)07 Nov 2019
धडाकेबाज खेळीनंतर रोहित ८५ धावांवर माघारी

बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतल्यानंतर धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा ८५ धावांवर माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो सीमारेषेवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५धावा कुटल्या.

21:58 (IST)07 Nov 2019
शिखर धवन त्रिफळाचीत; भारताला पहिला धक्का

संयमी खेळी करणारा शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्यामुळे ११८ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या.

भारताकडून बांगलादेशविरूद्ध ही सर्वाधिक सलामी भागीदारी ठरली. तसेच टी २० सामन्यात रोहित-धवन जोडीची शतकी भागीदारीची ही चौथी वेळ ठरली.

21:51 (IST)07 Nov 2019
हिटमॅनचा दणका; ३ चेंडूत लगावले ३ षटकार

रोहित शर्माने अर्धशतक साजरे केल्यावर आपला रुद्रावतार दाखवून दिला. त्याने मोसद्दक हुसेनच्या गोलंदाजीवर ३ चेंडूवर ३ षटकार खेचले.

21:39 (IST)07 Nov 2019
षटकार लगावत 'हिटमॅन'चे धडाकेबाज अर्धशतक

भारतीय संघाचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्मा याने २३ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक ठोकले. हे रोहितचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. रोहितने षटकार लगावत दिमाखात आपले अर्धशतक साजरे केले.

21:29 (IST)07 Nov 2019
रोहित-धवन जोडीची धमाकेदार सुरूवात

१५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने धमाकेदार सुरूवात करत ५ व्या षटकात भारताला अर्धशतक गाठून दिले.

20:51 (IST)07 Nov 2019
बांगलादेशची झुंजार फलंदाजी; भारतापुढे १५४ धावांचे आव्हान

लिटन दास, मोहम्मद नईम, सौम्या सरकार आणि मोहम्मदुल्लाह यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

20:45 (IST)07 Nov 2019
कर्णधार महम्मदुल्लाह माघारी; बांगलादेशला सहावा धक्का

बांगलादेशचा कर्णधार महम्मदुल्लाह २१ चेंडूत ३० धावा करून माघारी परतला. त्याने त्याच्या खेळीत ४ चौकार लगावले. उसळत्या चेंडूला दिशा देताना तो झेलबाद झाला.

20:31 (IST)07 Nov 2019
अफीफ हुसेन झेलबाद; बांगलादेशचा निम्मा संघ माघारी

दमदार फटकेबाजी करण्याच्या इराद्याने फलंदाजी करणारा अफीफ हुसेन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. ८ चेंडूत ६ धावा करून तो माघारी परतला.

20:14 (IST)07 Nov 2019
सौम्या सरकार ३० धावांवर माघारी

डावखुरा फलंदाज सौम्या सरकार खेळपट्टीवप स्थिरावल्यानंतर ३० धावांवर माघारी परतला. २० चेंडूत झटपट ३० धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला.

20:06 (IST)07 Nov 2019
धोकादायक मुश्फिकूर स्वस्तात माघारी

गेल्या सामन्यात धडाकेबाज खेळी करून बांगलादेशला विजय मिळवून देणारा धोकादायक मुश्फिकूर रहीम या सामन्यात स्वस्तात माघारी परतला. त्याने केवळ ४ धावा केल्या.

19:57 (IST)07 Nov 2019
बांगलादेशला दुसरा धक्का; नईम झेलबाद

धडाकेबाज खेळी करणारा मोहम्मद नईम मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३६ धावा केल्या.

19:43 (IST)07 Nov 2019
बांगलादेशला पहिला धक्का; लिटन दास धावचीत

बांगलादेशला दोन जीवनदान मिळाल्यानंतर लिटन दास अखेर धावचीत झाला. चहलच्या गोलंदाजीवर लिटन दासला पायावर चेंडू लागला आणि  थोडासा गोंधळ झाला. त्याचा फायदा घेत पंतने चेंडू स्टंपवर मारला आणि लिटन दासला धावचीत झाला.

वाचा सविस्तर - Video : याला म्हणतात ‘बदला’… आधी संधी गमावली पण नंतर केला ‘हिसाब बराबर’

19:35 (IST)07 Nov 2019
पंतच्या चुकीमुळे बांगलादेशला जीवनदान

युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर लिटन दास फलंदाजी करताना क्रीजच्या पुढे आला. पंतने पटकन स्टंपिंग केले, पण पंतच्या चुकीमुळे बांगलादेशला जीवनदान मिळाले. पंतने स्टंपच्या पुढे चेंडू पकडला त्यामुळे तो बाद होऊनही त्याला नाबाद घोषित करण्यात आला.

वाचा सविस्तर -Video : पंतच्या अतिउत्साहाचा भारताला फटका; बांगलादेशला मिळाले जीवनदान

18:45 (IST)07 Nov 2019
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

--

भारताचा संघ

--

बांगलादेशचा संघ