इंग्लंडनं दिलेल्या ५७८ धावांचा आव्हानांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारतीय संलामीवीर स्वस्तात माघारी परतले. जोफ्रा आर्चरनं अवघ्या सहा धावांवर रोहित शर्माला बटलरकरवी झेलबाद केलं. लयीत असणाऱ्या शुबमन गिल यालाही आर्चरनं २९ धावांवर बाद केलं. गिलचा झेल मिड-ऑनला जेम्स अँडरसनने उत्तमप्रकारे घेतला. गिलनं २८ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीनं २९ धावा केल्या. पहिल्या१० षटकांच्या आतमध्ये जोफ्रा आर्चरनं भारतीय संघाच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केलं.

५७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघानं भारताने पहिल्या डावात १२ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून अनुभवी चेतेश्वर पुजारा २६ चेंडूत १९ धावांवर आणि कर्णधार विराट कोहली ९ चेंडूत ३ धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप ५२१ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर
इंग्लंड संघानं पहिल्या डावांत १९०.१ षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली आहे. रुटनं ३७७ चेंडूत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने ८२ आणि डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली. भारताकडून बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी मिळवले आहेत. तर इशांत आणि नदीम यांनी दोन-दोन बळी घेतले.

रोहितच्या मुलीची स्टेडियममध्ये उपस्थिती –
रोहित शर्माची दोन वर्षांची मुलगी समायरा आणि पत्नी रितीका या दोघीही तिसऱ्या दिवशी चेपॉक स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. बीसीसीआयने दोघींचा एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.