India vs England Test Series : ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड करणारी टीम इंडिया ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर उभी ठाकणार आहे. इंग्लडच्या भारत दौऱ्याला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेने सुरूवात होणार आहे. त्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने काही दिवसांपूर्वी संघाची घोषणा केली. शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड नंतर केली जाणार आहे. ही कसोटी मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड समितीने जाहीर केलेल्या १८ जणांच्या संघात रविंद्र जाडेजाचा समावेश नव्हता. पण त्यानंतरच्या दोन कसोटींसाठी त्याच्या नावाच विचार केला जाणार होता. असे असताना जाडेजाला बोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीचे पुनरागमन होत आहे. तो पालकत्व रजा संपवून पुन्हा संघात येणार आहे. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचंही दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन होत आहे. फिरकीपटू अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. तर पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन या खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे.

आणखी वाचा- “मला माझं नाव…,” धोनीसोबत होणाऱ्या तुलनेवर अखेर ऋषभ पंतने दिली प्रतिक्रिया

पहिल्या दोन कसोटींसाठी भारताचा संघ-

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

कसोटी मालिकेचे वेळापत्रक-

५ ते ९ फेब्रुवारी – पहिली कसोटी – चेन्नई
१३ ते १७ फेब्रुवारी – दुसरी कसोटी – चेन्नई
२४ ते २८ फेब्रुवारी – तिसरी कसोटी (दिवस/रात्र) – अहमदाबाद
४ ते ८ मार्च – चौथी कसोटी – अहमदाबाद