भारतीय पुरुष हॉकी संघाने बंगळुरुत न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या हॉकी मालिकेत आपला दुसरा विजय नोंदवला आहे. भारताने पाहुण्या न्यूझीलंड संघावर ३-१ ने मात केली. या मालिकेतला पहिला सामना भारताने ४-२ च्या फरकाने जिंकला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यातही बाजी मारत भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताकडून एस. व्ही. सुनीलने पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या गोलपोस्टवर आक्रमण रचत गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यूझीलंडचा गोलकिपर रिचर्ड जॉईसने हा प्रयत्न हाणून पाडला. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंचं अधिक वर्चस्व पहायला मिळालं, मात्र गोल करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. दुसऱ्या सत्रात भारताने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. १८ व्या मिनीटाला भारताला लागोपाठ ३ पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाला, यातील तिसऱ्या संधीवर गोल करत ड्रॅगफ्लिकर रुपिंदपाल सिंहने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर २४ व्या मिनीटाला न्यूझीलंडच्या स्टिफन जेनीसने भारतीय गोलकिपर पी. आर. श्रीजेशला चकवत चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला.

मात्र बरोबरीचा हा आनंद न्यूझीलंडला फारकाळ घेता आला नाही, २७ व्या मिनीटाला सिमरनजीत सिंहसोबत रचलेल्या चालीला सुरेख फिनीशींग टच देत एस. व्ही. सुनीलने भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी तिसऱ्या सत्रात चांगला बचाव करत भारताला आणखी गोल करण्याची संधी दिली नाही. मात्र याचवेळी भारतावर आक्रमण करण्याची संधीही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी गमावली. अखेरच्या सत्रात ५६ व्या मिनीटाला सुनीलने दिलेल्या पासवर मनदीप सिंहने सुरेख मैदानी गोल करत भारताच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.