महेंद्रसिंह धोनी यष्टीरक्षण करत असताना आपल्या गोलंदाजांना सतत काहीतरी सल्ले देत असताना आपण ऐकलेलं आहे. कित्येकदा कुलदीप, युजवेंद्र चहल यासारख्या फिरकीपटूंना धोनीच्या सल्ल्याचा चांगलाच फायदाही झाला आहे. आपल्या खास शैलीत चेंडूचा टप्पा कुठे ठेव, फलंदाज कसा फटका खेळेल हे सर्व अंदाज यष्टींमागून धोनी बिनचूकपणे बांधतो. महाराष्ट्राचा केदार जाधव हा धोनीचा गोलंदाजीतला हुकमी एक्का मानला जातो. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात धोनी केदार जाधवला यष्टींमागून चक्क मराठीतून मार्गदर्शन करताना दिसला.

अवश्य वाचा – IND vs NZ : हार्दिक पांड्या आणि षटकारांचं हे अनोखं नातं माहिती आहे का?

केदार जाधवने दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा बळी घेत, भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली. यानंतर केदारने न्यूझीलंडच्या धावगतीला आवर घालण्याचं महत्वाचं कामही केलं. यादरम्यान गोलंदाजी करत असताना धोनीने केदारला, पुढे नको भाऊ….घेऊन टाक!!! असा मराठमोळा सल्ला दिला. स्टम्प माईकमध्ये धोनीचा हा मराठमोळा अंदाज कैद झाला आहे.

दरम्यान, गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला 253 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. अखेरचा वन-डे सामना 35 धावांनी जिंकत भारताने 5 वन-डे सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. तब्बल 10 वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडचा संघ 44.1 षटकात 217 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

अवश्य वाचा – IND vs NZ : छोटेखानी खेळीत हार्दिकचा मोठा विक्रम, सचिनच्या विक्रमाशी बरोबरी