भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे ‘महासंग्राम’ असतो. त्यातच तो जर विश्वचषकातील सामना असेल, तर सामन्यातील रोमांच आणखी वाढतो. गेल्या वर्षी इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड मैदानावर विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले. पाऊस आणि टीम इंडियाची दमदार गोलंदाजी-फलंदाजी अशा ‘डबल सर्जिकल स्ट्राईक’मुळे पाकच्या संघाला ८९ धावांनी पराभूत व्हावे लागले. या विजयासह भारताने सलग सातव्यांदा पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले होते. त्या सामन्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. ICC ने देखील या सामन्याबाबतची आठवण शेअर केली आहे.

असा रंगला होता सामना

नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. राहुलनंतर रोहितने कर्णधार विराटच्या सोबतीने संघाचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी झाली. रोहितने १४० धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ७७ धावा केल्या. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ५० षटकांत ३३६ धावा केल्या.

३३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं पाक संघाला शक्य झालं नाही. ३५ व्या षटकापर्यंत पाकिस्तानी फलंदाज अडखळत खेळत होते. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. बराच वेळ वाया गेल्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार, सुधारित लक्ष्य देण्यात आलं. त्यानुसार पाकिस्तानला ५ षटकांत १३६ धावा करणं भाग होतं. त्या आव्हानाने पाकचं कंबरडंच मोडलं. सलामीवीर फखार झमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण केवळ दोन धावांनी बाबर आझमचं अर्धशतक हुकलं. पाठोपाठ फखार झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक हे मातब्बर फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतले.

विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभव स्विकारण्याची परंपरा पाकिस्तान संघाने कायम राखली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर हा सातवा विजय ठरला.