लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात स्थान मिळालेल्या रोहित शर्माने संघातली आपली जागा अधिक पक्की केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावलं. या मालिकेतलं रोहित शर्माचं हे तिसरं शतक ठरलं. याआधी विशाखापट्टणम कसोटीत रोहित शर्माने पहिल्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावलं होतं. कसोटी कारकिर्दीतलं रोहितचं हे सहावं शतक ठरलं.

या शतकी खेळीसह रोहित शर्मा एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी अशी कामगिरी केली होती.

रोहित शर्माने अजिंक्य रहाणेच्या सोबत शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय फसला. मयांक, पुजारा आणि कोहली हे स्वस्तात माघारी परतले. यानंतर रोहित आणि अजिंक्यने खेळपट्टीवर पाय रोवून धरत संघाचा डाव सावरला. अजिंक्य रहाणेनेही अर्धशतक झळकावत रोहित शर्माला उत्तम साथ दिली.