विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याला पावसाचा फटका बसला. चहापानाच्या सत्रापर्यंत भारतीय फलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. सलामीवीर रोहित शर्माचं नाबाद शतक(११५) आणि मयांक अग्रवालने (८४) त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेरीस बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारली. पण चहापानाआधी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द केला.

रोहित शर्माने सलामीवीर म्हणूनच पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याचसोबत ICC च्या स्पर्धांमध्ये त्याने एक विशेष विक्रम केला. ICC च्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शतक लगावले होते. त्यानंतर रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळण्यात आलेल्या आजच्या कसोटी सामन्यात शतक लगावले.

रोहित शर्मा

दरम्यान, भारतीय कसोटी संघात प्रथमच सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने शतकी खेळीची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितचं हे पहिलं तर एकूण कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठरलं. याचसोबत एकदिवसीय, टी २० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. दणकेबाज खेळी करत रोहितने १७४ चेंडूंचा सामना केला आणि १२ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११५ धावा केल्या.