भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगला सूर गवसला आहे. गेल्या काही वर्षांत अजिंक्यच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मर्यादीत षटकांच्या संघात अजिंक्यने आपली जागा गमावली आहे, मात्र कसोटी संघात अजिंक्य हा महत्वाचा खेळाडू असल्याचं कर्णधार विराट कोहलीने वारंवार सांगितलं होतं. अँटीग्वा येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्यने पहिल्या डावात ८१ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. दुसऱ्या कसोटी सामन्यातही पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर अजिंक्यने कर्णधार विराट कोहलीच्या सोबत शतकी भागीदारी रचत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली.

या भागीदारीदरम्यान विराट-अजिंक्य जोडीने माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर असलेला विक्रमही मोडीत काढला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या जोडीत विराट-अजिंक्य ही जोडी अव्वल ठरली आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या डावातली शतकी भागीदारी ही विराट-अजिंक्य जोडीची आठवी शतकी भागीदारी ठरली. सचिन-सौरवच्या नावावर ७ शतकी भागीदाऱ्या जमा आहेत. मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर या जोडीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर सहा शतकी भागीदाऱ्या जमा आहेत.

दरम्यान, पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आश्वासक खेळ केला. तरीही सलामीवीर मयांक अग्रवालला झटपट माघारी धाडण्यात विंडीज यशस्वी ठरलं. फिरकीपटू रोस्टन चेसने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने ते ही माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा मोह टाळत खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे भर दिला. ज्याचा फायदा भारतीय संघाला झालेला पहायला मिळाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद ५१ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५३ धावांवर खेळत होता.

अवश्य वाचा – Ind vs WI : रहाणे-कोहलीच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताकडे भक्कम आघाडी