अभेद्य बचाव आणि अचूक आक्रमकता या रणनीतीनिशी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने तगडय़ा इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवून जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. व्ही. आर. रघुनाथ आणि तलविंदर सिंग यांनी भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने इंग्लंडचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.
उपांत्य फेरीत भारतासमोर तगडय़ा बेल्जियमचे आव्हान असणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनावर २-१ असा विजय मिळवला.
तिसऱ्या मिनिटापासून भारताने आक्रमणाला सुरुवात करताना इंग्लंडच्या गोलजाळीवर हल्ला चढवला. इंग्लंडच्या फिल रॉपरने चोख प्रत्युत्तर देताना यजमानांच्या पेनल्टी क्षेत्रावर चाल केली, मात्र रुपिंदरपाल सिंगने रॉपरचे प्रयत्न हाणून पाडले. सातव्या मिनिटाला देविंदर वाल्मीकीने चेंडूवर ताबा मिळवताना इंग्लंडच्या बचाव फळीला भेदले. अगदी पेनल्टी क्षेत्रापर्यंत तो चेंडू घेऊन गेला आणि रीव्हर्स फ्लिकद्वारे तो तलविंदरकडे सोपवीला. तलविंदरला मात्र गोल करण्यात अपयश आले.
१९व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताने कोणतीही चूक न करता गोल केला. रघुनाथच्या या गोलने यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडकडूनही आक्रमक खेळ झाला, परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची अभेद्य भिंत त्यांना पार करण्यात अपयश आले. मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. ३९व्या मिनिटाला मध्यरेषेवरून मिळालेल्या पासवर तलविंदरने इंग्लंडची बचाव फळी भेदून भारतासाठी दुसरा गोल केला. ५२व्या मिनिटाला सिमॉन मँटेलने गोल करून इंग्लंडचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या दहा मिनिटांत दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला, परंतु भारताने विजय निश्चित करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.