मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
मागच्या वर्षी आशियाई स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळवणाऱ्या महिला हॉकीपटूंना यंदाच्या वर्षी मात्र उपविजेदेपदावर समाधान मानावं लागलं आहे. भारतीय खेळाडूंमध्ये असा सातत्याचा अभाव का दिसतो?

सातत्याचा अभाव हा भारतीय क्रीडा क्षेत्रास असलेला शापच आहे. कधी कीर्तीचे शिखर गाठले जाते तर कधी शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागते हे भारतीय क्रीडा क्षेत्रात सातत्याने दिसून येत असते. महिला हॉकी क्षेत्रही त्यास अपवाद नाही. गतवेळी सहज अजिंक्यपद मिळविणाऱ्या भारतीय महिलांना यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

यंदाचे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये किमान कांस्यपदक मिळविण्याची क्षमता असलेल्या भारतीय महिला हॉकी संघास कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडकडून सपाटून मार खावा लागला होता. त्या वेळी भारतीय संघाच्या अनेक उणिवा स्पष्टपणे दिसून आल्या होत्या. यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्वचषक हॉकी स्पर्धा आदी स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दारुण अपयश व आगामी महत्त्वपूर्ण स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत उपविजेतेपद मिळवीत पुन्हा विजयपथावर मजल मारली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघासही पदक मिळविण्यात अपयश आले होते. त्यांनाही कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही विभागांतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांमध्ये खांदेपालट करण्यात आली. पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरीन यांच्याकडे महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली तर महिला संघाचे प्रशिक्षक हरिंदरसिंग यांच्याकडे पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले. मरीन यांनी याआधीही महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना महिला संघातील खेळाडूंच्या गुणदोषांचा बारकाईने अभ्यास आहे. पुरुष संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स हे अपयशी ठरल्यानंतर व हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर असलेला सुखसंवाद संपल्यामुळे ओल्टमन्स यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली व त्यांच्या जागी मरीन यांच्याकडे पुरुष संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. मात्र मरीन हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपयशी ठरले. त्यातही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत भारतीय पुरुष संघातील अनेक खेळाडूंनी तक्रार केल्यामुळे मरीन यांना पुन्हा महिला संघासाठी पाचारण करण्यात आले आहे.

मुळातच प्रशिक्षकपद कोणाकडे दिले तरी भारतीय खेळाडूंमध्ये असलेल्या उणिवा जोपर्यंत मुळापासून दूर होत नाहीत तोपर्यंत प्रशिक्षकाच्या कार्यपद्धतीबाबत मर्यादाच राहणार आहेत. पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याबाबत सतत उणिवाच दिसून येतात. एरवी फील्डगोलच्या संधी मिळणे ही भारतीय खेळाडूंसाठी खूपच अवघड गोष्ट असते. त्यातही भारतीय संघाच्या चालींमध्ये प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यासाठी आवश्यक असणारी भेदकता नसते. त्याचप्रमाणे खेळाडूंमध्ये सांघिक सुसंवादाचा अभाव दिसून येतो. पेनल्टी कॉर्नर मिळविणे हेदेखील एक हुकमी तंत्र मानले जाते. त्याकरिता प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडण्याची शैली आपल्या खेळाडूंमध्ये दिसून येत नाही. विशेषत: शेवटच्या तीन-चार मिनिटांमध्ये हे तंत्र खूपच उपयोगी पडत असते. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायावर किंवा हातावर नकळत चेंडू कसा मारता येईल हे आपल्या खेळाडूंनी शिकले पाहिजे. अर्थात प्रतिस्पर्धी खेळाडूही हेच तंत्र आपल्यावरही उलटू शकतात हेही आपल्या खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भक्कम बचाव करणे ही सांघिक खेळासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला यजमान दक्षिण कोरियाकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. कोरियाचे खेळाडू भक्कम बचावाबाबत ख्यातनाम आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे खेळाडू गोल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संधी निर्माण करण्याबाबतही माहीर समजले जातात. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कोरियन खेळाडूंना चांगली झुंज दिली. मात्र गोल करण्याच्या अनेक संधी भारताला साध्य करता आल्या नाहीत. कोणताही प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला गोल करण्याच्या संधी देत नसतो. या संधी आपणच निर्माण करायच्या असतात. त्याकरिता संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेइतकी १०० टक्के कामगिरी करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संघातील खेळाडूंमध्ये सुसंवादाची गरज असते. प्रत्येक खेळाडूने वैयक्तिक कौशल्याबरोबरच पासिंगच्या तंत्राबाबतही सर्वोच्च कामगिरी केली पाहिजे. दुर्दैवाने भारतीय संघातील अनेक खेळाडू वैयक्तिक कामगिरी कशी चांगली होईल याचाच फक्त विचार करीत असतात. साहजिकच त्याचा अनिष्ट परिणाम संघाच्या कामगिरीवर होत असतो. मात्र याचा विचार आपले खेळाडू करीत नाहीत.

पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याबाबत भारतीय खेळाडूंमध्ये अनेक वेळा कमकुवतपणा दिसून येतो. संघात केवळ एक-दोनच खेळाडूंनी या तंत्रात अव्वल शैली निर्माण न करता प्रत्येक खेळाडूला या संधीचा लाभ कसा घेता येईल याचा विचार सराव शिबिराच्या वेळी होणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया, अर्जेन्टिना, बेल्जियम, इंग्लंड, न्यूझीलंड आदी देशांमधील खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याबाबत विविधता निर्माण केली आहे. त्यांच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे. गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गोलात मारण्याचे तंत्र विकसित केले पाहिजे. सहसा गोलरक्षकाच्या एका हाताची बाजू कमकुवत असते. याबाबत प्रतिस्पर्धी संघातील गोलरक्षकांच्या शैलीचा व्हिडीओद्वारे अभ्यास केला पाहिजे.

आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेच्या वेळी भारताची कर्णधार राणी रामपाल हिच्यासह तीन-चार अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. आगामी अनेक स्पर्धाचा विचार करता हा निर्णय योग्यच होता. तिच्याऐवजी संघाचे नेतृत्व सुनीता लाक्रा हिच्याकडे सोपविण्यात आले होते. सुनीताच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जपान, चीन व मलेशिया यांच्यावर शानदार विजय मिळविला होता. साखळी गटात कोरियाला  १-१ असे बरोबरीत रोखलेही होते. या चार सामन्यांमध्ये जी प्रभावी कामगिरी भारताने केली होती तशी कामगिरी त्यांच्याकडून अंतिम फेरीत दिसली नाही. त्यांनी कोरियाला कौतुकास्पद लढत दिली. मात्र गोल करण्याच्या अचूकतेअभावी त्यांना हा सामना गमवावा लागला होता. उपविजेतेपद हीदेखील भारतीय संघासाठी आश्वासक कामगिरी आहे. यंदा होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा विचार करता भारतीय संघातील कमकुवतपणा कसा दूर होईल यासाठी सराव शिबिरात भर देण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर विजेतेपद मिळविणे ही भारतीय खेळाडूंसाठी खूप अवघड कामगिरी असली तरी किमान कांस्यपदक मिळविण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. भारतीय खेळाडूंनीही आपल्याकडे ही क्षमता आहे असा आत्मविश्वास बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही स्पर्धेच्या वेळी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत आपण १०० टक्के परिपूर्ण आहोत याचीही खात्री प्रत्येकाने बाळगली पाहिजे. आजकाल केवळ राष्ट्रीय संघ नव्हे तर राज्याच्या संघांबरोबरही फिजिओ, मसाजिस्ट, वैद्यकीय तज्ज्ञ असा सपोर्ट स्टाफ असतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त आहे ना याची खात्री संबंधित संघाच्या व्यवस्थापक व प्रशिक्षकांनी केली पाहिजे. विश्वविजेतेपद दूर नाही असा आत्मविश्वास बाळगला तर किमान कांस्यपदक मिळविता येते हे भारतीय खेळाडूंनी आपल्या मनावर बिंबविले पाहिजे. तसे झाले तरच भारतीय हॉकी क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण होऊ शकेल.
सौजन्य – लोकप्रभा