केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचं बीसीसीायने स्पष्ट केलंय. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यातला प्रस्तावित दौरा खेळण्याची विनंती केली होती. या दौऱ्यासाठी भारतीय संघाला क्वारंटाइन सुविधा तयार करुन देण्याची तयारी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दाखवली आहे. याचसोबत या दौऱ्यातले सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यासही श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तयार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

“लॉकडाउन संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेतं आणि काय नियम आखून देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर भारती संघाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असेल तर आम्ही श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळण्यास तयार आहोत.” बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना माहिती दिली. भारतात पुन्हा एकदा क्रिकेट सुरु व्हावं यासाठी बीसीसीआयही प्रयत्नशील आहे. करोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात भारतीय खेळाडूंना सरावाची परवानगी मिळते का याची चाचपणी बीसीसीआयचे अधिकारी करत आहेत.

सध्या सर्व क्रिकेट बोर्डांना करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केल्यास लंकन क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी भारतातील केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात काय निर्णय घेतं याची वाट पहावी लागणार आहे.